ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घोडबंदर येथील कासारवडवली भागात ५ ऑक्टोबरला दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत अतिमहत्त्वाचे व्यक्ती तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर वाहतुकीस बंदी लागू केली आहे. या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. मोदी यांना पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑक्टोबरला कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सुमारे ४० हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक घोडबंदर मार्गे कासारवडवली मैदानात पोहचतील. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधीत वाहतुक करण्यास परवानगी आहे. घोडबंदर मार्गाने उरण जेएनपीटी येथून हजारो अवजड वाहने गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. तसेच गुजरात, वसई येथून वाहने भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करत असतात. हलक्या वाहनांची वाहतुक देखील या मार्गावरून मोठ्याप्रमाणात होत असते. अवजड वाहनांमुळे कोंडी किंवा अपघात होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.

हेही वाचा – कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा

पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर ५ ऑक्टोबरला २४ तास बंदी लागू केली आहे. असे असले तरी मोदी यांच्या सभेसाठी भाजपचे पदाधिकारी वाहनांनी, बसगाड्यांनी विविध भागातून घोडबंदर मार्गे मैदानात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठयांचा खेळ !

अवजड वाहनांची पर्यायी वाहतुक

  • गुजरात येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने मनोर टेन नाका येथून विक्रमगड, पाली, वाडा, आबिटघर, आटगाव, शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करतील.
  • नाशिक येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे नवी मुंबई, जेएनपीटी मार्गे वाहतुक करतील.
  • मुंबई येथून वाहतुक करणारी जड-अवजड वाहने ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टेन नाका मार्गे वाहतुक करतील. किंवा जोगेश्वरी विक्रोळी मार्गे पश्चिम द्रुतगती मार्गाने वाहतुक करतील.
  • नवी मुंबई येथून गुजरात किंवा नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने कर्जत, मुरबाड, शहापूर मार्गे नाशिक तसेच आटगाव, आबिटघर, वाडा, पाली, विक्रमगड, मनोर टेन नाका, गुजरात मार्गे वाहतुक करतील.