जयेश सामंत
ठाणे : राज्यात सत्ताबदल घडण्यापूर्वी ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या एकहाती सत्तेविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी शनिवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्यापुढे आम्ही केलेली मेहनत वाया जाऊ देऊ नका आणि हे शहर कुणालाही आंदण देऊ नका या शब्दात आपले गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बावनकुळे यांनी शनिवारी दिवसभर ठाण्यात बैठकांचा सपाटा लावला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, शहरातील उद्योजक, वेगवेगळय़ा जाती-धर्माच्या प्रतिनिधींसह भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी युती करण्याचा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घ्या आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊनच पुढील गणिते मांडा असा आग्रह यावेळी बावनकुळे यांच्यापुढे धरण्यात आला.
ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांचा शब्द गेल्या काही वर्षांपासून प्रमाण मानला जातो. २०१४ नंतर राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवली आणि ठाणे या दोन्ही महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात संघर्ष करताना दिसले.
पाच वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने भाजपचे आव्हान तोकडे ठरल्याचे दिसून आले. नौपाडा, पाचपाखाडी, घोडबंदर या शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात भाजपने चांगली कामगिरी केली. कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. गेल्या दीड-दोन वर्षांत महापालिका हद्दीतील १४२ प्रभागांपैकी १२० प्रभागांमध्ये भाजपने उमेदवारांची चाचपणी केली होती. ठाणे शहर, वर्तकनगर, घोडबंदर, वागळे इस्टेट यासारख्या भागात काही उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. ठाणे महापालिकेतील कारभाराविषयी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी अडीच वर्षांत मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले होते. असे असले तरी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी मात्र संधी मिळेल त्या पद्धतीने महापालिकेतील कारभाराविरोधात दंड थोपटताना दिसत होते.
स्मार्ट सिटी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. सत्तांतरानंतर आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे स्थानिक पदाधिकारी गोंधळल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी बावनकुळे यांच्याशी झालेल्या संवादात यापैकी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही केलेली मेहनत वाया जाऊ देऊ नका’ असे आर्जव केल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर पक्षाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील युतीसंबंधी निर्णय घेतला जाईल पक्ष वाढविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असून कोणत्याही पक्षातून पक्षात प्रवेश करणाऱ्याचे स्वागतच आहे.
-चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष