पर्यटनाच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर आता पालिका निवडणुकांसाठीही हेच पर्यटनाचे सुत्र इच्छुक नगरसेवकांनी अवलंबण्यास घेतले आहे. ओबीसी आरक्षणाची सोडत पूर्ण झाल्यानंतर प्रभागांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पावसाळ्याचा मुहुर्त साधत अनेकांनी मतदारांसाठी वर्षा सहलींचे आयोजन केले आहे. याच्या जाहिरातीसाठी राज्यात गेल्या काही दिवसात गाजलेल्या ‘काय झाडी, काय डोंगर’ या संवादाचाही आधार घेतला जातो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इच्छुकांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे –

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिकांचा सदस्यांचा कार्यकाळ यापुर्वीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे या महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वच महापालिकांमध्ये निवडणुकपूर्व तयारीला सुरूवात झाली आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर पालिकांची प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. नुकत्याच आलेल्या ओबीसी आरक्षण मान्यतेच्या निर्णयानंतर सर्वच पालिकांना ओबीसी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर महापालिकेची ओबीसी आरक्षण नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे या तिनही शहरांमधील प्रभागांचे आणि निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता सर्वपक्षीय इच्छुकांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी इच्छुकांनी आता पावसाळ्याचा मुहुर्त साधला आहे. पावसाळ्याचे वातावरण अनुभवण्यासाठी त्यांना वर्षा सहलीला नेण्याचे नियोजन केले जाते आहे.

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय उलथापलथीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा संवाद प्रचारासाठी वापरला जातो आहे. काय झाडी, काय डोंगर म्हणत नागरिकांना वर्षा सहलीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले जाते आहे. महिला, पुरूष, तरूणांचे गट तयार करून नियोजन केले जाते आहे.

धार्मिक स्थळांसह निसर्ग दर्शनाला पसंती –

ठाणे जिल्ह्यापासून जवळ असलेल्या कर्जत, खोपोली, लोणावळा, इगतपुरी येथील निसर्ग रम्य ठिकाणे यासाठी निवडली जात आहेत. तर नाशिक, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांचाही समावेश यात केला जातो आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला यांसाठी विशेष व्यवस्था केली जाते आहे. शेत घरे, रेसॉर्ट यासाठी बुक केली जात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane before the elections organizing a varsha trip for the voters by the interested candidates msr