ठाणे-बेलापूर उन्नत मार्गातील अतिशय महत्त्वाचा असलेल्या ऐरोली- काटई नाका मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामास वेग आला आहे. हा मार्ग तयार झाल्यास ऐरोली ते डोंबिवली गाठणे वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांत शक्य होणार आहे. तसेच महापे, शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होऊ शकते.
कल्याण डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना महापे, शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी ऐरोली ते काटई नाका असा १२ किलोमीटर लांब मार्ग तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. हा मार्ग उन्नत आणि भुयारी स्वरूपातील आहे.

परवानग्या तसेच भूसंपादन यामुळे एमएमआरडीएने तीन टप्प्यांमध्ये या मार्गाची आखणी केली आहे. त्यानुसार, ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असा पहिला टप्पा, ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रस्ता असा दुसरा टप्पा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते काटई नाका असे तीन टप्पे पाडण्यात आले.
यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. भुयारी आणि उन्नत स्वरूपातील हा टप्पा आहे. उन्नत कामासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये परवानगी मिळाली होती. तर भुयारी मार्ग हा पारसिक डोंगर पोखरून करण्यात येत आहे. त्यासाठी मे २०१८ मध्ये परवानगी मिळाली होती. येत्या वर्षभरात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

एकूण १२.३ किलोमीटर लांब रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी ही ३.५५ किमी इतकी आहे. यातील भुयारी मार्ग हा १.६९ किलोमीटर लांबीचा आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन-तीन मार्गिका असणार आहे. तर, भुयारी मार्गामध्ये तीन अधिक एक मार्गिका असेल. यातील अधिकची मार्गिका ही अत्यावश्यक वापरासाठी असेल. याशिवाय भुयारी मार्गिकेतील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणादेखील असणार आहे