ठाणे : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर वन मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन घेतलेला जनता दरबार आणि त्यानंतर ठाण्यातील भाजपच्या आमदारांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ सुरु केलेले उपक्रम यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने (शिंदे गट) मंगळवारपासून ‘जन संवाद’ उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, हा जन संवाद शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातून सुरू झाला आहे. या जन संवादात ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. शिवसेनेने सुरू केलेल्या या जन संवाद उपक्रमामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच ठाण्यात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात ठाणे महापालिका क्षेत्रातील शेकडो नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते. तसेच ठाण्यात ‘फक्त कमळ’ अशी घोषणा देखील यापूर्वी गणेश नाईक यांनी केली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर शीत युद्ध रंगले होते. त्यातच भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानंतरत शिंदे गटाकडूनही आता जनता संवाद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ‘समस्या, सेवा आणि समाधान’ या त्रिसुत्रीवर आधारीत आनंद आश्रमात मंगळवारपासून ‘जन संवाद’ उपक्रम सुरु केला असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. त्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व नुकतेच काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेले ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी हा जनता संवाद उपक्रम घेतला. यावेळी शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, दर मंगळवारी आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच महापालिका संबधित नागरीकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या जन संवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्य:स्थितीतील वाद – कलह आदीसह ठाणे नगर विकास आराखड्या बाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. या जनता संवादामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.