ठाणे : आणीबाणीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ऐसीतैशी करणारे आता संविधान बचावासाठी गावभर फिरत असल्याचे सांगत संविधान आम्ही बदलणार नाही, कुणाला बदलू देणार नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना सांगितले. आपण चांगल्या उपहारगृहात चवीसाठी तर शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जातो, त्यावेळी आपण जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी ठाण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष कालवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असा अप्रचार करण्यात आला. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला. परंतु आम्ही संविधान बदलणार नाही, बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
आणीबाणीच्या काळात काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची दुरुस्ती केली. परंतु आमचे सरकार येताच आम्ही त्या दुरुस्त्यांमध्ये बदल केला. ज्या काँग्रेसने संविधानाची ऐसीतैशी केली, तीच कॉंग्रेस आता संविधान बचावासाठी गावभर फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे गेल्या ६० वर्षांमध्ये देशाचा जेवढा पाहिजे, तेवढा विकास झाला नाही, आपला देश श्रीमंत आहे पण, जनता मात्र गरीब आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
योग्य नीती, नेतृत्व आणि देशासाठी काम करणे, अशी मनोभावे आणि प्रामाणिकपणे इच्छा असली पाहिजे. अशीच इच्छा ठेवून आमच्या सरकारने काम केले, त्यामुळे जे ६० वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने काम करून दाखवले, असेही ते म्हणाले. देशात प्रकल्पांच्या कामासाठी पैशांची कमी नसून इमानदार नेत्याची फक्त गरज आहे, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही ही महाराष्ट्रात आली पाहिजे, शिवशाही म्हणजे आदर्श राज्य निर्माण करण्याची संकल्पना आहे. अशीच इच्छा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. सातत्याने तंत्रज्ञानात मोठे बदल होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपण देशाच्या शाश्वत विकास केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या आजही कायम आहे. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी होईलच आणि त्याचबरोबर प्रदूषण कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घोडबंदर मार्गे जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहतूकीमुळे कोंडी होते. विविध प्रकल्पांमुळे कोंडीची समस्या कमी होईल. नवी मुंबईतील विमानतळ हे वॉटर टॅक्सीने जोडण्यात येणार असून यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.