सचिन्स
आधुनिक तंत्रज्ञानाला अंगी असलेल्या उपजत कौशल्याची जोड देत यशस्वीपणे जागतिक दर्जाचे उत्पादन मिळविणारी अनेक उदाहरणे देशात आहेत. पुरेसे शिक्षण नसतानाही केवळ अनुभव आणि सरावाच्या भांडवलावर उच्च दर्जाचे कौशल्य दाखवून पारंगत अभियत्यांनाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडणाऱ्या आपल्याकडच्या या देशी जुगाडाचा बराच बोलबालाही आहे. देशी जुगाडाचे हेच तंत्र वापरून एका ठाणेकर उद्योजकाने जागतिक दर्जाच्या वातानुकूलित यंत्रणेला लागणारी साधने बनविण्यात यश मिळविले आहे. त्या उद्योजकाचे नाव- रमेश म्हात्रे. रायगड जिल्ह्य़ातील अलिबागचा जन्म असलेल्या रमेश म्हात्रे यांचा डिफ्यूझर (सेंट्रलाईज्ड एअर कडिंशनिंग सिस्टीम) बनविण्यात हातखंडा असून त्यासंदर्भातले अनेक पेटंटही त्यांच्या नावावर आहेत. सचिन्स इन्पेक्स, प्रतिमेश इंडस्ट्रीज् आणि म्हात्रे इंजिनीअरिंग प्रा. लि. या नवी मुंबईतील तीन कंपन्यांद्वारे बनविले जाणारे ‘सचिन्स डिफ्यूझर’ जगभरात सर्वत्र विकले जातात.
इतर अनेकांप्रमाणे रमेश म्हात्रे जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण करून १९६४ मध्ये अलिबागहून मुंबईत नोकरीसाठी आले. बॉम्बे मोटर बॉडी बिल्डर, रुबी इंडस्ट्रीज, इंदा बॅटल आदी ठिकाणी फिटर म्हणून काम करण्याच्या अनुभवावर त्यांना ठाण्यातील व्होल्टास कंपनीत नोकरी मिळाली. मात्र केवळ त्या नोकरीवर समाधान न मानता तिथे असणाऱ्या दोन दिवसांच्या सुट्टीचा उपयोग करून त्यांनी १९७८ पासून स्वत:चा जोडव्यवसाय सुरू केला. सुरुवात शिंपले विकण्यापासून केली. त्यानंतर १९८२मध्ये त्यांनी ठाण्यामध्ये दहा बाय बारा फुटाचा गाळा भाडय़ाने घेतला. सीमेन्स आणि एल अॅन्ड टी या दोन कंपन्यांना लागणारे इलेक्ट्रिकलचे सुटे भाग ते बनवीत. १९८४मध्ये त्यांनी खोपट येथील औद्योगिक संकुलात स्वत:च्या मालकीचा गाळा घेतला. पुढे कामाचा व्याप वाढल्याने १९८८ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. अवघ्या सहा वर्षांत १९९०मध्ये खोपटला त्यांचे सहा गाळे झाले.
१९९२मध्ये दुबईतील एका अरब उद्योजकाने त्यांना पहिली ऑर्डर दिली. रमेश म्हात्रे यांचे काम त्याला अतिशय आवडले. पुढे काम पाहून मध्य पूर्वेतील इतर देशांमधूनही त्यांना कामाच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. मध्य पूर्वेतील देशांमध्ये उकाडा खूप असल्याने डिफ्यूझरला खूप मागणी असते. त्यावेळी हे डिफ्यूझर हे तुकडय़ा तुकडय़ाने बनविले जात. ते सर्व तुकडे जोडून एकसंध वातानुकूलित यंत्रणा बने. मात्र या पद्धतीत काही दोष होते. तुकडे जोडताना अनेकदा त्यात लहान-मोठी फट राहायची. त्यात धूळ, मातीचे कण अडकत. त्यामुळे त्याचा परिणाम थंडाव्यावर होई. तुकडय़ांमध्ये अडकणारी ही धूळ काढण्याचे काम खूपच जिकरीचे आणि कटकटीचे होते. यावर काही उपाय नाही का? यंत्रणेतील हा दोष काढण्यासाठी काय करता येईल? रमेश म्हात्रे विचार करू लागले. बराच काळ या प्रश्नांचा गुंता त्यांच्या मनात होता. एकदा दुबई दौऱ्यात हॉटेलमध्ये आपल्या रूममध्ये असताना ‘तुकडय़ा तुकडय़ाने जोडला जाणारा डिफ्यूझर बनविण्यापेक्षा अखंड (वनपीस) डिफ्यूझर बनविता आला तर?’ असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. क्षणाचाही वेळ न दवडता हाती येईल तो कागद घेऊन हॉटेलमधील त्या रूममध्येच रमेश म्हात्रे यांनी अखंड डिफ्यूझरचा कच्चा आराखडा तयार केला. भारतात परत आल्याआल्या त्यांनी त्यांची ही कल्पना कारखान्यात प्रत्यक्ष उतरविण्यास सुरुवात केली. सहा महिने हे काम सुरू होते. त्यातून जगातील पहिला अखंड (वनपीस) डिफ्यूझर बनविण्यात रमेश म्हात्रे यशस्वी झाले. दुबईतील ग्राहकाने अखंड डिफ्यूझर ओके असल्याच्या अहवालाबरोबरच चक्क एक कंटेनरची ऑर्डर दिली. रमेश म्हात्रे यांच्या उद्योजकीय वाटचालीतील हा टर्निग पॉइंट होता. त्यांच्या शोधामुळे डिफ्यूझर निर्मिती क्षेत्रात क्रांती झाली. एकतर डिफ्यूझरच्या किमती पूर्वीच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्य़ांनी कमी झाल्या. फटी किंवा भेगा (गॅप्स) नसल्याने धूळ साचून राहणे बंद झाले. परिणामी हवेचे वहन निर्धोकपणे होऊ लागले. साहजिकच देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. सध्या ‘सचिन्स’ नावाने दहा प्रकारचे डिफ्यूझर बाजारात आहेत. मध्य पूर्वेकडच्या देशांमध्ये अगदी पहिल्यापासूनच हे अस्सल भारतीय बनावटीचे डिफ्यूझर लोकप्रिय होतेच, पण हळूहळू अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्येही ‘सचिन्स’चे डिफ्यूझर निर्यात होऊ लागले. कोणत्याही देशी उद्योगाची सुरुवात नेहमी स्थानिक बाजारपेठेपासून होते.
रमेश म्हात्रेंच्या बाबतीत मात्र नेमके उलटे घडले. त्यांचे उत्पादन आधी परदेशात विकले गेले. नंतर भारतात सचिन्स डिफ्यूझरची विक्री होऊ लागली. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित रमेश म्हात्रे यांचा ‘सचिन्स’ हा सध्या डिफ्यूझर्स निर्मिती विश्वातील एक प्रमुख ब्रॅन्ड आहे. दहा प्रकारचे डिफ्यूझर्स ते बनवितात.
ब्रॅण्ड ठाणे : अखंड ‘डिफ्यूझर’ची ‘थंडगार’ क्लृप्ती
रमेश म्हात्रे जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण करून १९६४ मध्ये अलिबागहून मुंबईत नोकरीसाठी आले.
Written by प्रशांत मोरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2016 at 04:06 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane businessman ramesh mhatre story