ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे सोपविल्यामुळे पक्षात कोणतीही नाराजी नाही असा दावा ऐकीकडे भाजपचे नेते करत असले तरीही गुरुवारी नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांना गणेश नाईक समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून आले. लोकसभा निवडणूकीसंबंधित पुढील दिशा ठरविण्यासाठी नाईकांनी महापे येथील क्रिस्टल हाऊस येथे समर्थकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आक्रमक झालेल्या नाईक समर्थकांनी म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे, नाईक कुटुंबाला संपविण्याचा डाव आहे असा आरोप केला.
ही बैठक सुरू असतानाच, काहीवेळातच आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के हे नाईकांच्या भेटीसाठी तेथे पोहचले. मात्र, या दोघांसमोरच नाईक समर्थकांनी घोषणा देत संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा दिला. विरोधाच्या घोषणा सुरू असताना म्हस्के आणि सरनाईक मात्र नाईकांच्या अँटी चेंबरमध्ये बसून होते.
हेही वाचा…ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याकडून मतांची जुळवाजुळव
ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपने गेल्या महिन्याभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केल्याचे चित्र होते. या मतदारसंघातून गणेश नाईक याचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी मिळावी असा भाजपचा आग्रह होता. भाजप श्रेष्ठींकडूनही ‘कामाला लागा’ अशा सूचना नाईक यांना देण्यात आल्या होत्या. यामुळे संजीव नाईक यांनी नवी मुंबई, मिरा भाईंदर भागात प्रचारही सुरू केला होता. शेवटच्या क्षणी ही जागा आपल्याला मिळेल या आशेवर नाईक समर्थक होते. या जागेसंबंधी निर्णय घेताना गणेश नाईक यांना विश्वासात घेतले जाईल अशी अपेक्षा नाईक यांच्या गोटात व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र बुधवारी या मतदारसंघातून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाईक समर्थकांना धक्का बसला.
गुरुवारी दिवसभर भाजपच्या आणि नाईक समर्थकांच्या गोटात शुकशुकाट होता. गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांची विशेष बैठक महापेत ठेवली होती. या बैठकीत पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक सुरू होताच गणेश नाईक यांनी आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी काम करायचे आहे अशी भूमिका मांडली. मात्र, आक्रमक कार्यकर्त्यांनी नाईक कुटुंबाला संपविण्याचा डाव आहे. साहेब संघर्ष करा, राजीनामा द्या.. अशी आक्रमक भूमिका मांडली.
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत दारूची आवक वाढली, कल्याण पूर्वेत तिसगावमध्ये दारूचा साठा जप्त
बैठकीत कार्यकर्ते गोंधळ घालत असतानाच त्याठिकाणी शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे पक्षाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत पोहचले. या दोघांना बघताच नाईक समर्थकांच्या घोषणा आणखी वाढल्या. समर्थक आक्रमक झालेले पाहून नाईकांनी या दोघांना अँटी चेंबरमध्ये घेऊन जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यानंतरही आक्रमक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती.