ठाणे : म्हाडा योजनेत ३५ लाख रुपयांचे घर २१ लाख रुपयांत मिळवून देतो असे सांगून महिलेची ७ लाख ६० हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. म्हाडामध्ये कमी किमतीत घरे देऊन फसवणूकीचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे.
फसवणूक झालेले व्यक्ती मुंबईत वास्तव्यास आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी तिची ओळख एका व्यक्तीशी झाली होती. त्याने म्हाडाचे घर कमी किमतीत देतो असे सांगितले होते. त्यानुसार, ठाण्यातील एका उपाहागृहात घराबाबत त्यांची चर्चा झाली. आपण ३५ लाख रुपयांचे घर २१ लाख रुपयांत देतो असे त्या व्यक्तीने सांगितले. महिलेकडे कोणतेही घर नसल्याने तिने गृह खरेदीस होकार दिला. काही दिवसांनतर त्या व्यक्तीने तिची ओळख आणखी एका व्यक्तीसोबत करुन दिली. आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना ओळखत असून ते घर मिळवून देतील असे तिला सांगण्यात आले. तिला म्हाडाचे घर लागल्याची बनावट कागदपत्रही देण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून तिच्याकडून सुमारे टप्प्याटप्प्याने सात लाख रुपये घेतले.
तीन महिन्यानंतर आणखी एक व्यक्ती त्या महिलेला भेटला. आपण म्हाडाचे अधिकारी असून आणखी साडे सहा लाख रुपयांची मागणी त्याने केली. महिलेने त्याला ५० हजार रुपये दिले. महिलेने घराबाबत विचारणा केली असता, तिला पुन्हा टाळण्यात आले. तिला शंका आल्याने तिने म्हाडाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.