ठाणे – शहरात मराठी नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्षे असल्यामुळे चार महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. यंदा संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन संस्थांना केले असल्याची माहिती श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या सचिव डॉ. आश्विनी बापट यांनी दिली. तसेच यंदाच्या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागतयात्रेत सहभाग असतो.

हेही वाचा – सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

ठाणे शहरात श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. यासाठी गुढीपाडव्याच्या महिनाभर किंवा दीड महिनाआधीपासून तयारीला सुरुवात केली जाते. दर सोमवारी यासंदर्भात बैठक पार पडते. या बैठकीत शहरातील विविध संस्था सहभागी होतात. कोणत्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला जाईल याचे नियोजन या बैठकीत केले जाते. तसेच गुढीपाडव्याच्या तीन दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. यंदा स्वागत यात्रेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे चार महिन्याआधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे.

हेही वाचा – ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई

यासंदर्भातील पहिली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत शहरातील १० ते १५ संस्थांनी सहभाग नोंदवला होता. विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच यंदा स्वागत यात्रेला २५ वर्षे होत असल्यामुळे यंदाची स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. तसेच जानेवारी महिन्यापासून कार्यक्रम सुरु करण्याचे त्यांचे नियोजन आहे. यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तर, यंदाच्या यात्रेत भारतीय संविधानाची भलीमोठी प्रतिकृती उभारण्याचा मानस असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तर,संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन देखील त्यांनी संस्थांना केले आहे. यासंदर्भातील पुढील बैठक सोमवार, २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पार पडणार असल्याची माहिती श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या सचिव डॅा. आश्विनी बापट यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane chitrarath on the theme of constitution in this years new year swagat yatra ssb