ठाणे : घोडबंदर येथील सिनेवंडर मॉल आणि ओरियन बिजनेस पार्कला मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्री उशीरापर्यंत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे कार्य सुरू होते. घोडबंदर येथील कापूरबावडी परिसरात सिनेवंडर मॉल आहे. मंगळवारी रात्री येथील मॉल आणि त्याशेजारी असलेल्या ओरियन बिजनेस पार्कला अचानक भीषण आग लागली.
Video >>
घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत पथकाकडून आग विझविण्याचे कार्य सुरू होते. आगीचे कारण अद्याप कळू शकले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. आगीमुळे कापूरबावडी ते तीन हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रात्री मुंबईहून घोडबंदर, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
ओरियन बिझनेस पार्क ही तळ अधिक ५ मजली इमारत असून त्याठिकाणी अंदाजे ८० ते ९० कार्यालये आहेत. त्याच्या बाजूला असलेल्या सिने वंडर मॉल आहे. ओरियन बिझनेस पार्क मधील पझल पार्किंग मधील वाहनांना आग लागली आहे. आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.