महापालिकेतील महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांच्याकडेला नागरिकांच्या सोयीसाठी जाहीरात हक्क देऊन ३० शौचालये उभारणीची निर्णय ठाणे महापालिकेने काही वर्षांपुर्वी घेतला होता. प्रत्यक्षात ३० पैकी ११ शौचालयांची कामे पुर्ण झालेली आहेत. त्यातही अनेक शौचालये बंदावस्थेत असताना त्याठिकाणी उभारलेल्या फलकांवर जाहीरातींचा व्यवसाय सुरळीतपणे सुरु असल्याचे दिसून येते. यामुळे या योजनेतून नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी ठेकेदाराचे चांगभले होत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून महापालिकेने शहरात खासगी लोकसहभागातून शौचालये उभारणीचा निर्णय घेतला होता. संबंधित ठेकेदाराला जाहीरात हक्क देऊन त्याच्याकडून शौचालयांची बांधकामे करून घेतली जाणार होती. या योजनेत दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ३० शौचालयांची उभारणी केली जाणार होती. घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बाळकुम, ठाणे शहर, कॅडबरी चौक, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्ये ही शौचालये उभारणीचे नियोजन होते. या शौचालये उभारणीची कामे पुर्ण झालेली नसतानाही ठेकेदाराने जाहीरात फलक उभारून व्यवसाय सुरु केल्याचा प्रकार सुरुवातीला उघ़डकीस आला. तेव्हापासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे. ठाणे शहरातील मानपाडा, माजिवाडा, बाळकुम तसेच इतर भागांमध्ये अशा शौचालयांची उभारणी करण्यात आली असली तरी मानपाडा आणि बाळकुम भागातील शौचालये बंदावस्थेत आहे. मानपाडा शौचालयाला टाळे लावण्यात आलेले आहे. असे असतानाही शौचालयांच्या बाजुला ठेकेदाराने उभारलेल्या जाहीरात फलकांवर मोठ्या जाहीराती झळकताना दिसून येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेली शौचालये बंदावस्थेत असताना दुसरीकडे ठेकेदाराचे मात्र चांगभले होत असल्याचे चित्र आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते. माजिवाडा भागात मात्र शौचालय सुरु असल्याचे दिसून येते.

ठाणे महापालिका महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांच्याकडेला नागरिकांच्या सोयीसाठी जाहीरात हक्क देऊन ३० शौचालये उभारण्यात येणार होती. त्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांनी आतापर्यंत ११ शौचालयांची उभारणी केली असून त्यातील सहा ते सात शौचालये सुरु झाली आहेत, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ठेकेदाराला जाहीरात हक्क देऊन शौचालयांची उभारणी करण्यात येत आहे. ही कामे पुर्ण झाल्यानंतर ती शौचालये सुरु करण्यात येत आहेत. आतापर्यंत ११ शौचालये उभारण्यात आली असून त्यातील ६ ते ७ शौचालये सुरु आहेत. उर्वरित शौचालये सुरु करण्यात येतील.— मारुती खोडके, उपायुक्त, जाहिरात विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane citizens do not have toilet facilities due to inadequate work asj