ठाणे : ठाणे पोलिसांकडून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंगद्वारे कारवाई करण्यात येते. परंतु ही कारवाई नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात आता ठाण्यातील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारपासून ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी ठाण्यातील नागरिकांना एकत्र करुन ज्याठिकाणी कारवाई केलेली वाहने आणली जातात. तिथे उभे राहून नागरिकांना जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच नियमांविषयी माहिती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे टोईंगचा प्रश्न आता ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्यालगत बेकायदेशिरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर वाहतुक नियंत्रण विभागाकडून कारवाई केली जाते. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी टोईंग वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्याला वाहनाच्या क्रमांकाची उद्घोषणा करुन संबंधित वाहन रस्त्यावरून हटविण्यास सांगितात. परंतु त्यानंतरही वाहन चालक त्याठिकाणी आला नाही, तर त्या वाहन चालकाची दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केली जाते. या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग व्हॅनच्या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. प्रत्येक टोईंग व्हॅनवर किमान पाच ते सहा कर्मचारी काम करतात.
हेही वाचा…महावितरणची वीज देयक भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
दुचाकी उचलत असताना ती चुकीच्या पद्धतीने टोईंग व्हॅनवर ठेवली जाते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते. तसेच अनेकदा दुचाकी चालक परिसरातच उभा असतो. त्याच्या समोरच दुचाकी उचलली जाते. चालक विनंती करतो. परंतु त्याचे वाहन सोडले जात नाही. या ठेकेदाराचे कर्मचारी देखील नागरिकांना दमदाटी करत असतात. विशेष म्हणजे, ही दमदाटी टोईंग व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यासमोर सुरु असते. अनेकदा प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत. परंतु हे चित्र बदलले नाही. अशा अनेक तक्रारी येत असल्याने ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात जगजागृती आंदोलन सुरु केले आहे.
अजय जया यांच्यासह ठाण्यातील काही सुजान नागरिकांनी ज्याठिकाणी कारवाया केलेल्या दुचाकी आणल्या जातात. तिथे त्यांच्या प्रतिनिधींना उभे राहण्यास सांगितले आहे. तसेच टोईंग कारवाईच्या मागे वसूलीचा प्रकार सुरू आहे का? याची देखील पडताळणी करण्यास सांगितले आहे. कारवाई केल्यास काय करावे याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे टोईंगचा वाद आता पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…ठाणे : पावसाळा सुरु होताच प्रवाशांचे हाल सुरु; शहरात रिक्षांचा तुटवडा
नागरिकांना आवाहन केल्यानंतर समाजमाध्यमांवर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. आम्ही ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत आहोत. ज्या ठिकाणी दुचाकींवर कारवाई होते. तिथे आमचे प्रतिनिधी उभे आहेत. त्यामुळे दुपारपासून टोईंगची कारवाई अचानक थंडावली आहे. -अजय जया, माहिती अधिकार कार्यकर्ता.
यासंदर्भात ठाणे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.