tvlog01राज्यामधील वीज तुटवडय़ामुळे दहा दिवसांपूर्वी ठाणेकरांवर अचानक भारनियमन लादण्यात आले. पाऊस, बेपत्ता झाल्याने वाढलेली विजेची मागणी याला जबाबदार असल्याने महावितरणने लादलेल्या या भारनियमनाबाबत नागरिकांनी फारशी तक्रार केली नाही. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही या भारनियमनाची कल्पना नव्हती, हे धक्कादायक होते. अशा प्रकारची वीज आणीबाणी उद्भवू नये यासाठी नागरिकांची कायम महावितरणकडे अपेक्षा राहणार असून त्यातून मार्ग काढण्यासाठीही महावितरणही काही पावले उचलू लागले आहे.

मंगळवार १४ जुलै..ठाण्यातील विविध भागांतील वीज सकाळी सहा वाजल्यापासून हळूहळू बंद होऊ लागली. भारनिमनाची कोणतीच घोषणा नव्हती किंवा विजेच्या देखभाल दुरुस्तीची पूर्वसूचनाही नव्हती. ठाणे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा, पाचपाखाडी, लोकमान्य नगर, सावरकरनगर, ठाणे स्थानक रस्ता, बी-केबिन परिसर, गोखले रस्ता सगळीकडे वीजपुरवठा बंद होता. काही ठिकाणी वीज अडीच तासांनंतर आली तर काही ठिकाणी दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता. विजेच्या या अघोषित बंदमुळे नागरिकांमध्ये मोठी चलबिचल सुरू होती.  महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रावर फोनचा भडिमार सुरू झाला. तक्रारींचा पाऊस सुरू झाल्यानंतर महावितरणकडून अघोषित भारनियमन होत असल्याची कबुली देण्यात आली. राज्यामधील वीज तुटवडय़ामुळे हे संकट ओढवले असून राज्यातील सगळ्याच शहरांना त्याचा फटका सहन करावा लागत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, यापुढे अशा प्रकारची वीज आणीबाणी उद्भवू नये यासाठी नागरिकांची कायम महावितरणकडे अपेक्षा राहणार असून त्यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणही काही पावले उचलू लागले आहे. ठाण्यासारख्या शहरामध्ये नागरी वस्ती, उद्योग यांचा भरणा अधिक असून या सगळ्यांना विजेचा आवश्यक पुरवठा व्हावा यासाठी सगळ्याच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.
पावसाने मारलेली दडी, वातावरणातील उकाडा-उष्णता, ग्राहकांचा वाढता वीज वापर, कृषी ग्राहकांची वाढती मागणी या सर्व कारणांमुळे राज्यात विजेची मागणी सुमारे १६ हजार ५०० मेगाव्ॉट इतकी प्रचंड वाढली. विजेची उपलब्धता १५ हजार ते १५ हजार ५०० मेगाव्ॉट असल्याने वीज यंत्रणा वाचविण्यासाठी नाइलाजास्तव महावितरणला १४ व १५ जुलै या दोन दिवशी सर्वच गटांमध्ये काही तासांचे अघोषित भारनियमन करण्यात आले.
महानिर्मितीने १४ जुलै रोजी चंद्रपूर येथील ५०० मेगाव्ॉटचा संच सुरू केल्यामुळे महानिर्मितीच्या वीज उपलब्धतेत ४ हजार ५५ मेगाव्ॉट एवढी वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. पाण्याअभावी परळी येथील १ हजार १३० मेगाव्ॉट विजेची निर्मिती बंद होती. पवन ऊर्जेतून अपेक्षित असलेल्या २ हजार मेगाव्ॉट विजेमध्ये मोठय़ा प्रमाणात घट होऊन तेथून केवळ ५०० ते ६०० मेगाव्ॉट वीज मिळत आहे. आदानी पॉवरचा ६६० मेगाव्ॉटचा संच तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. तसेच कोयना प्रकल्पाचा टप्पा क्र. चार मधील एक २५० मेगाव्ॉटचा संच तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी कोयना येथून सध्या १ हजार ५०० मेगाव्ॉटची निर्मिती होत आहे. याशिवाय पॉवर एक्स्चेंजमधून महावितरणने १००० ते १२०० मेगाव्ॉट वीज काही तासांसाठी विकत घेतली. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मिळेल त्या सर्व स्रोतांमधून जास्तीतजास्त वीज उपलब्ध करण्याचा महावितरण प्रयत्न करीत आहे. ही परिस्थिती १५ जुलैपर्यंत पूर्वस्थितीवर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. तरीही महावितरणने कृषी पंपाचे भारनियमन न करण्याची दक्षता घेतली. कृषी पंपांना निर्धारित तासांचा वीज पुरवठा करण्यात आला. विजेच्या तुटवडय़ामुळे महावितरणला अघोषित भारनियमनाशिवाय पर्यायच उरला नव्हता.
नागरिकांच्या अपेक्षा..
महाराष्ट्रातील नागरिकांना ऊर्जा संकटाची कल्पना आधीपासून असून अशा वेळी कळ सोसण्याची वृत्ती नेहमीच नागरिकांनी ठेवली आहे. मात्र महावितरणकडून येणाऱ्या ऊर्जा संकटाची कल्पना आधीच मिळाली तर नागरिक अधिक दक्ष राहून या समस्येचा सामना करू शकतात. मात्र महावितरण अशा अघोषित भारनियमनावर अधिक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कायम नागरिकांकडून केला जात आहे. अघोषित भारनियमनाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना होत असतो. ५० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहकांकडे वीज साठवण्याची कोणतीच यंत्रणा नाही. अनेक वेळा वीज येते, जाते असा लपंडावसुद्धा सुरू होता. त्यामुळे महावितरणचे हे नेमके काय चालले आहे असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. अचानक भारनियमन किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती महावितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचू शकेल, अशी यंत्रणा कार्यान्वित करावी. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात ही यंत्रणा सुरू करणे अत्यंत सोयीचे होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो. महावितरणच्या वतीने सुरू करण्यात आलेले मदत केंद्राचे क्रमांक हे प्रत्येक झोननुसार वेगवेगळ्या असल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या पद्धतीमध्ये मुंबई झोनमधील केंद्रात फोन करून कल्याण-डोंबिवलीची अडचण सांगितली जाते.
विजेच्या बचतीसाठी प्रयत्न
वीज हे सध्या नागरिकांच्या एकूण जीवनशैलीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे भारनियमन असो वा इतर तांत्रिक कारण वीजपुरवठा खंडित झाल्यास दैनंदिन जीवन कोलमडून पडते. महावितरणच्या वतीने वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू असतात. मात्र एकूणच विजेचा वापर वाढला असून यंत्रणेतील त्रुटींमध्ये गळती व हानी मोठय़ा प्रमाणात होत असते. हे टाळण्यासाठी महावितरणने विविध प्रयत्न सुरू केले आहेत. ‘वीज बचाव’साठी एलईडी बल्बचे वाटप असो किंवा बेरोजगार अभियंत्यांना फिडर फ्रेन्चायजी व्यवस्थापक नेमणे हे यातीलच काही प्रयत्न आहेत. गेल्या आठवडय़ांमध्ये या उपक्रमांची ठाणे, कल्याणमध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र, अशा उपक्रमांमध्ये त्रुटी राहू नयेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अन्यथा अघोषित भारनियमन सतत सहन करण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.

घरगुती ग्राहकांना एलईडी ब्लब वाटप
राज्यातील १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप करण्याची योजना राज्य सरकारने हाती घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेमुळे १३ हजार दशलक्ष युनिटच्या विजेची बचत होऊ शकेल. सुमारे ५०० मेगाव्ॉट विजेची मागणी या मोहिमेमुळे कमी होऊ शकणार आहे. तर ग्राहकांना एका वर्षांत एका बल्बमुळे सुमारे १८० रुपयांची वीज बचत होणार आहे. केंद्र सरकाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ व्ॉट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्यात येत आहेत. हे बल्ब शंभर रुपये रोख किंवा १०५ रुपये मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार आहे. या योजनेमुळे बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भारही पडणार नाही.

वीज हानी रोखण्यासाठी बेरोजगार अभियंत्यांची नियुक्ती..
सर्वाधिक वीज गळती असणाऱ्या आणि वसुली देयक कमी असणाऱ्या वीज वाहिन्यांवरील विजेची हानी कमी करण्यासाठी महावितरणने खाजगी तत्त्वावर मदत घेण्याचे निश्चित केले आहे. मीटर रीडिंग, बिल वाटप, नवीन वीज जोडणी देणे, वीज चोरी पकडणे, थकबाकी अथवा वीज चोरी आढळल्यास वीजपुरवठा खंडित करणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या वतीने या खाजगी तत्त्वावरील बेरोजगार अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत ठाणे विभाग १, २, ३, वागळे इस्टेट तसेच भांडुप आणि मुलुंड येथील फीडर फ्रेन्चायजी नेमण्यासाठी २३ जुलै रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येत्या २९ जुलै रोजी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथील फ्रेन्चायजी नेमणुकीसाठी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री इमारतीमध्ये मेळावा घेण्यात येणार आहे.

Story img Loader