ठाणे : शहरात गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे आहे. या २५ वर्षाच्या प्रवासात अनेक संस्था स्वागत यात्रेसोबत जोडल्या गेल्या आहेत. यातील काही संस्थांचे स्वागत यात्रेसोबत अगदी पहिल्या वर्षांपासून ऋणानुबंध आहे. स्वागत यात्रेच्या मार्फत ठाणे शहराचा सांस्कृतिक ठेवा जपला जात आहे. परंतू, त्यासह गेल्या २५ वर्षात शहरातील विविध संस्थांशी झालेला परिचय तसेच आपल्या संस्थेची झालेली नवी ओळख हे या स्वागत यात्रेचे वैशिष्ट आहे. सर्व स्तरावरची लोक विविध संकल्पना घेऊन एकत्रित मराठी नववर्षाचे स्वागत करुन, मराठी संस्कृतीचे जतन आणि प्रचार करतात हा एक विलक्षणीय क्षण असतो अशी प्रतिक्रिया गेले २५ वर्षांपासून स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या संस्थेने दिली.
ठाणे शहरातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित स्वागत यात्रा गेले वर्षानुवर्ष शहरात काढली जाते. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागतयात्रेत सहभाग असतो. यंदा श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचे २५ वे वर्षे आहे. या २५ वर्षाच्या प्रवासात स्वागत यात्रेत विविध संस्थांचा सहभाग लाभला आहे. यातील काही २५ हून अधिक संस्था गेले २५वर्षे या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांचे या यात्रेसोबत एक वेगळेच ऋणानुबंध निर्माण झाले असून ते या स्वागत यात्रेसाठी कार्यकर्ते म्हणून सुद्धा कार्यरत असल्याचे दिसून येतात. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ, संस्कार भारती, चित्पावन ब्राह्मण संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, तेली समाज, मराठा मंडळ, पर्यावरण दक्षता मंडळ, संस्कृत भारती अशा विविध २५ हून अधिक संस्था या स्वागत यात्रेच्या पहिल्या वर्षापासून सहभागी होत आहेत.
मराठी नववर्ष स्वागत यात्रेत पहिल्या वर्षापासून मराठा मंडळ सहभागी होत आहेत. पर्यावरण, विविध घडामोडींवर आधारित चित्ररथ गेले २५ वर्ष या स्वागत यात्रेत साकरत आहोत. पारंपारिक वेश्यात सहभागी होऊन या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याता प्रयत्न आमची संस्था करते. या स्वागत यात्रेच्या माध्यमातून सर्व संस्था एकत्रित येत, मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार करतात हा अनुभव बघण्यासारखा असतो, अशी प्रतिक्रिया मराठा मंडळ संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी दिली. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने एका झेंड्याखाली येऊन संस्कृती, संस्कार ,रूढी ,परंपरा, इतिहास ,सामाजिक संदेश, मानवता, पर्यावरण असे विविध विषय सकारात्मकतेने सर्व ठाणेकरांसमोर,समाजासमोर मांडण्याची संधी मिळते. या यात्रेत एकत्र येऊन आपण सर्वजण माणूस म्हणून एकच आहोत, याची जाणीव सर्वांच्या मनात प्रज्वलित नक्की होऊ शकते हे इतके वर्षाच्या यात्रेमधून शिकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया गेले अनेक वर्षे यात्रेत सहभागी होणाऱ्या राज्याभिषेक समारोह संस्थेचे शंतनु खेडकर यांनी दिली.