जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत पाचशेच्या आसपास स्वाइन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच ३८२ रुग्ण आढळून आलेल्या ठाणे शहरात ज्येष्ठांसह महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय, ठाणे शहरातील घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात २०५ रुग्ण आढळून आल्याने हा परिसर रुग्ण संख्येत आघाडीवर आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत सांडपाणी चेंबर फुटल्याने रसायनयुक्त पाणी रस्त्यावर

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच, दुसरीकडे स्वाइन फ्लुच्या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपुर्वी स्वाइन फ्लुचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत पाचशेच्या आसपास रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकट्या ठाणे शहरात ३८२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात स्वाइन फ्लुच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जिल्ह्याच्या आकडेवारीतून दिसून येते. ठाणे शहरात आतापर्यंत ३८२ स्वाइन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४५ रुग्ण जुलै महिन्यात, २१५ रुग्ण ऑगस्ट महिन्यात तर, १९ रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. ३८२ रुग्णांपैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत तर,सक्रिय रुग्णांची संख्या ३५ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यु झाला असून त्यापैकी ९ रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत दुचाकी चोरणारा आजदे गावातील सराईत चोरटा अटक, १० दुचाकी जप्त, एक सायकल जप्त

आतापर्यंत आढळून आलेल्या ३८२ रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजेच १२३ रुग्ण हे ६० वर्षावरील तर, त्याखालोखाल ६० रुग्ण हे ५० ते ६० वयोगटातील आहेत. ५ वर्षाखालील वयोगटातील २७ रुग्ण, ६ ते १० वयोगटातील १३ रुग्ण, ११ ते २० वयोगटातील १५ रुग्ण, २० ते ३० वयोगटातील ३४ रुग्ण, ३० ते ४० वयोगटातील ५३ रुग्ण, ४० ते ५० वयोगटातील ५७ रुग्ण आहेत. त्याचबरोबर ३८२ रुग्णांमध्ये २०५ महिला तर, १७७ पुरुषांचा समावेश असून यामुळे महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाणही सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, ठाणे शहरातील घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात २०५ रुग्ण आढळून आल्याने हा परिसर रुग्ण संख्येत आघाडीवर आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

प्रभाग समितीनिहाय रुग्ण संख्या

प्रभाग समिती रुग्ण संख्या
दिवा १

मुंब्रा २
कळवा २०

लोकमान्य-सावरकर १४
माजिवाडा-मानपाडा २०५

नौपाडा-कोपरी २५
उथळसर ५०

वर्तकनगर ४८
वागळे इस्टेट १७

एकूण ३८२