ठाणे म्हणजे तलावांचे शहर! येथील निसर्गरम्य आणि रमनीय तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालतात. घटकाभर विसावा मिळावा आणि फेरफटका मारण्यासाठी या निसर्गसंपन्न तलावांचा उपयोग होतो. ठाणे tv16स्थानकाजवळ असलेला मासुंदा तलाव तर तरुणाईचा लाडका. त्याचबरोबर कचराळी, मखमली या तलावांनीही शहराचे सौंदर्य वाढविले आहे. पण ठाणे शहराचे खास नंदनवन बनलेला सुरेख तलाव म्हणजे उपवन. काळाच्या ओघातही या तलावाने आपले सौंदर्य आणि शांतता कायम राखली आहे. त्यामुळेच देवदर्शन आणि दोन घटका निवांत घालविण्यासाठी शेकडो ठाणेकर या रमनीय स्थळाला भेट देतात.
निसर्गरम्य येऊर म्हणजे ठाण्याचे.. याच येऊरच्या डोंगराच्या पायथ्याशी उपवनचा सुरेख तलाव आहे. एका बाजूला येऊरचा हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हवेवर हेलकावे घेणारे उपवन तलावाचे पाणी यामुळे हा परिसर अत्यंत सुंदर वाटतो.  या तलावाच्या काठालाच गणपतीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ठाणेकरांची नेहमीच उपवनकडे ये-जा सुरू असते. या तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी उत्खनन सुरू असताना एका पडक्या मंदिराचे अवशेष सापडले आणि एका दगडात गणपतीची सुरेख मूर्ती सापडली. त्यामुळे या तलावाच्या काठी गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. चतुर्थी आणि विशिष्ट दिवशी या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येथे भाविकांच्या रांगा लागतात.
तलावाच्या बाजूलाच बगिचा फुलविण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्य अधिक खुलते. विविध फुलझाडे व वनस्पतींनी हा बगिचा फुलविण्यात आला आहे. बगिच्याची रचनाही खुप सुंदर आणि रमणीय करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटकर्त्यांना येथे चित्रीकरण करण्याचा मोह आवरता येत नाही. सुंदर बगिचा, रमणीय तलाव आणि निवांत जागा यामुळे तरुण-तरुणींचा नेहमीच वावर या ठिकाणी असतो.
या निसर्गरम्य तलावात नौकाविहार करण्याचीही सोय आहे. त्यासाठी लहान लहान मोटारबोटची सोय महापालिकेने येथे केली आहे. सायंकाळच्या रम्य वातावरणात येथे जलविहार करण्याची मज्जा काही औरच आहे. तलावातच एका बाजूला शिवशंकराची सुंदर मूर्ती पाण्यातच बनविण्यात आली आहे. या मूर्तीमुळे या तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
या तलावाजवळच एक फुलबॉलचे मैदान बनविण्यात आले असून, अनेक फुलबॉलप्रेमी येथे भेट देत असतात. फुलबॉलचे सामने पाहात या तलावाच्या सौंदर्याचा अनुभव घेणारे अनेक जण येथे तुम्हाला आढळतील. तलावाच्या कडेकडेला जागोजागी विविध प्रकारची उपाहारगृहे तुम्हाला आढळतील. तिथे असलेल्या खमंग पदार्थामुळे तुमची रसनातृप्तीही होऊ शकते. पूर्वी ठाणे शहराबाहेर असलेल्या या तलाव परिसरात शाळेच्या सहली जायच्या. आता मात्र हा तलाव ठाणे शहराचाच भाग झाला आहे. मात्र तरीही या तलावाने आपले सौंदर्य आणि शांतता कायम राखली आहे. वाढत्या शहरीकरनामुळे ठाणे शहराची गजबज वाढली. मात्र उपवन तलाव परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अजूनही अबाधित आहे. त्यामुळेच सहजसफर करण्यासाठी आणि दोन घटका निवांत घालविण्यासाठी हा परिसर उपयुक्त आहे.

उपवन कला महोत्सव
उपवनच्या रम्य वातावरणाला आणखी प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी येथे ‘उपवन कला महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी आरंभ झालेल्या या महोत्सवामुळे अनेक रसिकही या परिसराला भेट देतात. या महोत्सवात अभिजात संगीत, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला यांचा सुंदर मिलाफ पाहयला मिळतो. अनेक राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय कलावंत या महोत्सवाला भेट देतात. या महोत्सवामुळे या परिसराचे सौंदर्य कलात्मक होऊन जाते.
उपवन
*काय पाहाल?
निर्सगरम्य तलाव, गणपतीचे सुरेख मंदिर
*कसे जाल?
ठाणे स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर.
स्थानकातून येऊर किंवा पोखरण जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.
स्थानकापासून रिक्षानेही जाता येते.

Story img Loader