ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या पाणी नियोजन आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात सुर्या, भातसा काळू या धरणांसह स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ८०० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असून याबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केलेल्या मागणीच्या आधारे मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वाढीव पाणी कसे देता येईल, याबाबत अभ्यास करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे ठाण्याला वाढीव पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून शहरात आजही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सद्यस्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडणार आहे.
हेही वाचा……मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला. त्यावेळेस शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी ४५ टक्के वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान, पायाभुत सुविधा, क्लस्टर योजना, याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. सद्यस्थितीत शहराला दररोज ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर असून उर्वरित ४०० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी सुर्या, भातसा या धरणांसह स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळावे यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केल आहेत.
याशिवाय, एमएमआरडीएच्या प्रस्तावित काळू धरणांमध्ये ४०० दशलक्षलीटर इतका पाणी कोटा मंजुर करावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाला जून महिन्यात एक पत्र पाठवून वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत सुर्या धरणातून मिरा-भाईंदर आणि वसई विरार शहराला पाणी दिल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणी हे ठाणे पालिका क्षेत्राला देण्याबाबत तसेच इतर जलस्त्रोतांमधून ठाण्याला वाढीव पाणी देण्याबाबत अभ्यास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या बैठकीला पालिका अधिकाऱ्यांसोबत उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
हेही वाचा…डोंबिवलीत कचोरे येथे अपंगासह त्याच्या बहिणींना बेदम मारहाण
लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी
वर्ष लोकसंख्या (अंदाजे) मुळ पाण्याची मागणी (प्रतीदिन) प्रतिदिन एकूण पाण्याची मागणी
२०२५ २८,३९, ९१८ ४२५.९९ दशलक्षलीटर ५४१ दशलक्षलीटर
२०४० ४२,१३,७१५ ६३२.०६ दशलक्षलीटर ७१४ दशलक्षलीटर
२०५५ ५९,०१,१६३ ८८५.१८ दशलक्षलीटर १११६ दशलक्षलीटर
हेही वाचा…डोंबिवलीत विवाहितेवर दोन भावांचा लैंगिक अत्याचार
पालिकेचा प्रस्ताव
ठाणे महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५० दशलक्षलीटर, भातसा धरणातून ५० दशलक्षलीटर, सुर्या धरणातून २०० दशलक्षलीटर तसेच सुर्या धरणातून मिरा-भाईंदर शहरास पाणी मिळाल्यानंतर स्टेम प्राधिकरणाकडून ५० दशलक्षलीटर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५० इतके वाढीव पाणी मिळावे. तसेच एमएमआरडीएच्या काळू धरणामध्ये ४०० दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर करण्यात यावा, असा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाकडे दिला होता.