Thane City Vidhan Sabha Election 2024 : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या दोन टर्मपासून भाजपाकडे आहे. पण त्यापूर्वी हा मतदारसंघ बरीच वर्षे शिवसेनेकडे होता. १९९० साली शिवसेनेचे मो. दा. जोशी पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार म्हणून येथे निवडून आले होते. तेव्हापासून २०१४ पर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसला अन् या मतदारसंघावर भाजपाने करिष्मा केला.

२००८ पर्यंत हा मतदारसंघ मोठा होता. परंतु, २००८ मतदार पूनर्रचनेत या मतदारसंघाचं विभाजन होऊन ठाणे मुख्य मार्केट, नौपाडा, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, टेंभी नाका, ठाणे जेल, कोपनेश्वर मंदिर या भागांपर्यंत मर्यादित झाला. २००४ साली याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. तर, २००९ नंतर त्यांना कोपरी पाचपाखडी या जागेवरून उमेदवारी देण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना दैवत मानणारे असंख्य ठाणेकर याच भागात राहतात. त्यामुळे त्यांच्या नावावर शिवसेनेला मते मिळत होती. परंतु, २०१४ ला महायुती तुटल्याने शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढली. तर, इतर पक्षही येथे स्वतंत्र लढले होते. २५ वर्षांचा इतिहास पाहता २०१४ लाही शिवसेनेलाच मतं मिळतील अशी आशा होती. परंतु, तेव्हा फासे उलटे पडले अन् भाजपाचे संजय केळकर निवडून आले. २०१९ लाही संजय केळकरांनीच माजी मारली. परंतु, आता शिवसेनेतील फूट, महायुती यामुळे राजकीय गणितं वेगळी असल्याने कोणाला जागा मिळणार आणि कोण निवडून येणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

हेही वाचा >> Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!

ठाणे शहर मतदारसंघावर कोणाचा दावा?

भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी या मतदारसंघावर दावा केलेलाच आहे. शिवाय, संजय वाघुले, संदीप लेले, कृष्णा पाटील आणि मृणाल पेंडसेही या जागेसाठी इच्छूक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, शिंदे गटाच्या शिवसेनेही या जागावरे दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपैकी कोणाला जागा मिळणार यावर एकमत झालेलं नाही. तर, दुसरीकडे मागच्या वेळी मनसेचे अविनाश जाधव याच मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यामुळे यंदाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी कडवी तिहेरी झुंज यावेळेस पाहायला मिळणार आहे.

संजय केळकर यांना ९२ हजार २९८ मते, मनसेच्या अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मागच्या वेळी पडली होती. म्हणजेच, अवघ्या २० हजारांच्या फरकाने अविनाश जाधव यांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे, यंदाची लढतही तितकीच कडवी होणार आहे.