ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्याने जाणवत असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाचामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे.

एमसीएचआय क्रेडाई या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थितांना शहराच्या पाणी आराखड्याबाबत माहिती दिली. ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल. यामुळे २०२६ मध्येच ठाणे शहरात पुढील २०३५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असा दावा आयुक्त राव यांनी केला.

ठाण्याला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष लीटर पाणी रोज उपलब्ध होत आहे. परंतु २०५५ पर्यंत सुर्या, काळु आणि शाई धरणातून पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठीचे नियोजन आखण्यात असून त्यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्तरावर बैठकाही झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर कशा पध्दतीने करावा, यासाठीचे नियोजन आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठीचीच नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाची पुढील २५ वर्षांची ब्ल्यु प्रिंट तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचे नियोजनही आखण्यात आलेले आहे. ठाण्यात कर्मशिअल स्वरुपाचे डेटा सेंटर, आयटी पार्क, तसेच इतर इंडस्ट्री उभी राहत आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोणातून एम्युझमेंट पार्क, ज्यु, स्नो पार्क आदींसह इतर पर्यटन स्थळे देखील विकसित होत आहेत. हे सर्व प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एमएमआरडीए मार्फत विकासाची कामे सुरु असून घोडबंदर रस्ता विस्तारीकरण, मिसिंग लिंक विकसित करणे, भिवंडीला जोडण्यासाठी तीन उड्डाणपुलांचे नियोजन, कोस्टल रोड, बोरीवली टनेल, फ्री वेचा विस्तार, उन्नत मार्ग, अंतर्गत मेट्रो आदींसह इतर विकास कामे सुरु असून येत्या काळात वाहतुक कोंडी मुक्त ठाणे होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत. तसेच घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला शुक्रवारी बैठकीत दिले आहेत. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचे काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामे एकाचवेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, परंतु भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader