न्यायालयाच्या आदेशानंतरही ठाण्यातील बेकायदा फलक, बॅनरविरोधात मूग गिळून बसलेल्या महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना या बेकायदा फलकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले संजीव जयस्वाल यांनी आदेश देताच अतिक्रमणविरोधी पथकाने दिवसभरात २१३ बेकायदा फलक उतरवले. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात मात्र अशी कारवाई हाती घेण्यात दिरंगाई का झाली, असा सवाल केला जात असून त्यांच्या कारभारातील बेशिस्तीचा आणखी एक नमुना यानिमित्ताने पुढे आला आहे.
ठाणे महापालिकेने शहरात कोणत्या ठिकाणी फलक उभे केले जावेत आणि त्यासंबंधीची परवानगी कशा प्रकारे दिली जावी, यासंबंधीचे एक सविस्तर धोरण नुकतेच आखले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरात बेकायदा फलकबाजीला अक्षरश: ऊत आला होता.
कल्याणचे खासदार श्रीकांत िशदे आणि पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी शहरभर फलक उभारण्याचा सपाटा लावला आहे.
न्यायालयाच्या आदेशाची जागोजागी पायमल्ली सुरू असताना ठाणे महापालिकेतील प्रभाग अधिकारी त्याकडे डोळेझाक करताना दिसत होते. शिवसेना नेत्यांच्या अभिनंदनासाठी उभारण्यात आलेले फलक काढण्याची धमक प्रभाग अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत होती. गेल्या दीड वर्षांपासून फेरीवाले, बेकायदा फलकांविरोधात कोणतीही ठोस मोहीम प्रशासनाने राबवलेली नाही.
तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांचा अर्धाअधिक काळ शहर विकास विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात जात असल्याने वाढत्या अतिक्रमणांकडे प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे बेकायदा फलक लावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांची भीड चेपली होती.
ठाणे शहरात राजकीय नेत्यांच्या समर्थकांना जागोजागी फलक लावण्यासाठी निमित्तच लागत असते. कोणताही साधा कार्यक्रम असला तरी फलकांवर अनेकांची छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात. यात फ्लेक्सचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. अनेकदा हे फलक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सिग्नल झाकोळून टाकतात. त्यामुळे चालकांसह वाहतूक पोलिसांना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा