शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून उद्या, शनिवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली असून या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला आहे. या बंदमुळे ठाणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>>कल्याण : तुरुंगातून सुटल्यानंतरही गुन्ह्यांची मालिका कायम
महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या शनिवारी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी ठाणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सामील होणार आहेत. या मोर्चामुळेच आधी वातावरण तापलेले असतानाच, त्यात आता वारकरी संप्रदायाकडून उद्या, शनिवारी ठाणे बंदची हाक देण्यात आल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>>ठाणे: भिवंडीत शाळेच्या कमानीची फरशी अंगावर पडून मुलाचा मृत्यू
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या चित्रफित समाज माध्यांवर प्रसारित झाल्या आहेत. या विधानानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या असून त्यात उपनेत्या अंधारे यांच्यावर टिकाही होऊ लागली आहे. असे असतानाच, त्यांच्या विधानांच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाकडून उद्या, शनिवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला असून या संघटना बंदसाठी रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून शनिवारी बंदची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठींबा दिला आहे. – नरेश म्हस्के,ठाणे जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना