ठाणे : ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून ठाणे शहरात १२७ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आलेली असतानाच, त्यापाठोपाठ आणखी १५७ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे एकाचवेळी सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ही सर्वच कामे मे महिनाअखेरपर्यंत उरकरण्याचे उद्दीष्ट पालिका प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले असून ही कामे सुरु करण्यासाठी वाहतूक विभागाचा ना हरकत दाखला देण्याची मागणी पालिका प्रशासनाने ठाणे पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे. ही मागणी पोलिसांकडून लवकरच मान्य होण्याची आशा पालिका प्रशासनाला असून एकाचवेळी हाती घेण्यात येणाऱ्या या कामांंमुळे ठाणे शहर कोंडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिकेतील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाने विश्रांती घेताच खड्डे भरणीची कामे केली जातात. परंतु काही दिवसांतच बुजवलेले खड्डे उखडतात. काही रस्त्यांची अक्षरश: चाळण होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. याच मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेकडून रस्ते कामांची आखणी करण्यात येत होती. परंतु या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. करोना काळात उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालिका प्रशासनाकडे रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध नव्हता.

हेही वाचा >>> ठाणे : डोंबिवलीतील ६५ भूमाफियांची बेकायदा दस्त नोंदणी कागदपत्र विशेष तपास पथकाच्या ताब्यात

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी २१४ कोटींचा निधी देऊ केला होता. या निधीतून शहरातील १२७ रस्त्यांची कामे सुरु आहेत. यूटीडब्लूडी, बीटूमेन (डांबर) आणि काँक्रीट अशा तीन प्रकारे रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. ही कामे वेगाने सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी आणखी ३९१ कोटींचा निधी पालिकेला देऊ केला आहे. या निधीतून शहरातील १५७ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, कोपरी, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील रस्ते कामांचा समावेश आहे. या कामांसाठी काढलेल्या निविदेतून ठेकेदार निवड करून ठेकेदारांना कामांचे कार्यादेश देण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे : सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड, २६ जानेवारीला रनर्स क्लॅनचा उपक्रम

या प्रक्रीयेनंतर लगेचच रस्ते कामांना सुरुवात व्हावी, यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच रस्ते कामांकरीता वाहतूक विभागाचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांना नुकतेच पत्र दिले असून त्यात सर्व रस्ते कामांना एकाचवेळी ना हरकत दाखला देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी मे महिनाअखेर ही कामे पुर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेने डोळ्यासमोर ठेवले असून त्यामुळेच एकाच वेळी कामे हाती घेण्याचे पालिकेने ठरविले असल्याचेही सुत्रांनी सांगितले. परंतु शहरात सद्यस्थितीत सुरु असलेल्या १२७ रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच आणखी १५७ रस्त्यांची कामे सुरु झाली तर कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader