समूह विकास योजनेसाठी मंत्रालयात बैठक
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे शहरातील बेकायदा झोपडय़ा आणि इमारतींचा समूह विकास (क्लस्टर) योजनेची घोषणा वर्षभरापूर्वी झाली असली तरी काही कारणास्तव ही योजना प्रत्यक्षात उतरू शकलेली नाही. या पाश्र्वभूमीवर या योजनेतील अडचणींचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी असून त्यापैकी काही इमारती कोसळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडू लागले आहेत. या घटनांमुळे अशा इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागल्याने शहरात क्लस्टर योजना राबविण्याकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यानुसार गेल्यावर्षी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर योजनेची घोषणा केली. मात्र, त्यामध्ये काही कारणास्तव ती कागदावरच राहीली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी क्लस्टर योजनेबाबत चर्चा केली आणि या योजनेतील अडचणी दूर करण्याची मागणी केली. त्यानुसार या संदर्भात येत्या मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू
वाडा, वार्ताहर
भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील गणपत पाटील (१५) या दहावीत ८५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यशाचा आनंद क्षणिक ठरला. निकालाची बातमी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगण्यापूर्वीच त्याचा सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. संकेतच्या घरातील वीज बेपत्ता झाल्याने तो दुरुस्तीचे काम करत होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्याचा मृत्यू झाला. मुलाला दहावीत चांगले गूण मिळाले म्हणून संकेतचे वडील पेढे आणण्यास गेले होते. मात्र घरी आल्यावर मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.