ठाणे: जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात विविध उपायोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करण्याचे आणि तेथील सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानुसार ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.

हेही वाचा… कल्याणमध्ये समोसा विक्रेत्या महिलेचा विनयभंग

शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांच्यासह परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री दहा वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. या महिलेच्या नातेवाईकांची चौकशी करून मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसेच या आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी केली. यानंतर मध्यरात्री दीड वाजता जिल्हाधिकारी शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या केंद्रातील शस्त्रक्रिया विभाग, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधे आहेत का याची चौकशी करून त्याची खातरजमाही केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या डेक्कन क्वीनमधून उतरताना तीन प्रवासी पडले; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार आणि औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी केल्या. तसेच आरोग्य केंद्रात पुरेसा पाणी आणि वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क राहून रुग्णांची सेवा करावी. प्रत्येक आरोग्य केंद्रातील औषध साठा पुरेसा आहे, याची खात्री करावी. औषध साठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी. औषध साठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी. आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक आणि योग्य औषधोपचार करावेत. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर रुग्णालय आणि रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane collector and chief executive officer of zilla parishad gave a surprise visit to primary health centers in shahapur taluka at midnight dvr
Show comments