जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसदेत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उत्कृष्ट वक्ता म्हणून गौरव करण्यात आला. विकसनशील भारताच्या उत्कर्षांला तरुणांनी हातभार लावावा, तरुणांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे यासाठी बाराव्या ‘राष्ट्रीय युवा संसदेचे’ आयोजन करण्यात आले होते. अनेक चाचण्यांच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट विद्यार्थी वक्त्यांची आणि सामाजिक परिस्थितीचे भान असणाऱ्या विद्यार्थ्यांची देशभरातून या राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय युवा संसदेत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या किरण बिष्ट आणि अर्चना दीक्षित या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट वक्त्यांचा किताब मिळवला.
या संसदेत सहभागी होण्यासाठी युवा संसदेची प्राथमिक फेरी जोशी बेडेकर महाविद्यालयात पार पडली. प्राथमिक फेरीतून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यापीठ स्तरावर किरण बिष्ट, अर्चना दीक्षित, विवेक तिवारी या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड विभागीय पातळीसाठी करण्यात आली. विभागीय फेरीत विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी आठ उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मुंबई विद्यापीठाला प्रथम पारितोषिक मिळाले तसेच किरण बिष्ट या विद्यार्थिनीला विभागीय पातळीवर उत्कृष्ट वक्ता म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर भारताच्या निरनिराळ्या भागांतील एकूण तीस शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या युवा संसदेत अर्चना दीक्षित या विद्यार्थिनीने संरक्षणमंत्री आणि किरण बिष्ट हिने विरोधी पक्ष सदस्य म्हणून आपली मते प्रभावीपणे मांडली. संसदीय स्वरूपाचे समर्पक चित्र विद्यार्थ्यांच्या या युवा संसदेत दिसून आले. जोशी बेडेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना उत्कृष्ट वक्त्या म्हणून दिल्ली येथील पारितोषिक वितरण समारंभात राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकासासोबतच इतर कला प्रकारांत सहभागी होऊन प्रावीण्य मिळवावे हाच महाविद्यालयाचा मानस असतो, असे सांगत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. युवा संसद यशस्वी होण्यासाठी स्टुडंट फोरमच्या कार्यवाह ‘व्यावसायिक कायदे’ विभागाच्या प्रज्ञा राजेबहादूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
निकालानंतर आता विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी घाई
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी विद्यार्थी आणि कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू आहे. भविष्यात डॉक्टर, इंजिनीयर, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक बनण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यासाठी योग्य त्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरूआहेत. शहरातील विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा, इंटरनेट उपलब्ध होत असल्याने प्रवेशासाठी रांगेचा ताप नाही. ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांना पुरेशा ऑनलाइन सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.
पूर्वी निकालानंतर महाविद्यालयामध्ये प्रवेशपत्रिका व माहितीपुस्तिका घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. काही वर्षांपासून प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्यामुळे महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणाऱ्या रांगांचे दृश्य नाहीसे झाल्यात जमा आहे. मात्र हे चित्र शहरी भागातील महाविद्यालयांपुरतेच मर्यादित असल्याचे दिसते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण तालुक्यातील जीवनदीप शिक्षण संस्थेच्या गोवेली महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील नवीन पुस्तकांची माहिती
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा उपक्रम
जतीन तावडे, युवा वार्ताहर
ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता ग्रंथालयातील नव्या पुस्तकांची माहिती व्हॉटस्अॅपद्वारे दिली जाऊ लागली असल्याची माहिती ग्रंथपाल नितेश सोनवणे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील एकूण ग्रंथसंपदेत अभ्यासक्रमनिहाय पाठय़पुस्तके, व्यवस्थापन, लेखा, विधि, अर्थशास्त्रावरील संदर्भग्रंथ, नियतकालिके, जर्नल्स, वर्तमानपत्रे, विविध विषयांवरील सीडी, स्पर्धा परीक्षासंबंधी पुस्तके, विद्यार्थ्यांनी बनवलेले निवडक प्रकल्प अशा वाचनसाहित्याचा संग्रह करण्यात आला आहे. अभ्यासविषयक पुस्तकांसोबत अवांतर वाचनासाठी ‘भगवद्गीता’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’, ‘संपूर्ण केशवसुत’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘लोकमान्य टिळकांचे चरित्र खंड’ अशा अनेक वैचारिक धाटणीच्या पुस्तकांबरोबरच ‘बिझनेस लीजंडस’, ‘एक असतो बिल्डर’, ‘लज्जा’, ‘जावे त्यांच्या देशा’ आणि तरुणाईला आवडणाऱ्या डॉ. अब्दुल कलाम, चेतन भगत, सुदीप नगरकर यांचे ‘यु आर द पासवर्ड ऑफ माय लाइफ’, ‘रिव्होल्यूशन २०२०’ सारखी वैशिष्टय़पूर्ण पुस्तके विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करतात. ग्रंथालयातील पुस्तकांची देवाणघेवाण हे पूर्णपणे संगणकीकृत असून वाचकांच्या मागणीनुसार वर्तमानपत्र कात्रणसेवा, टेबल ऑफ कंटेन्ट सेवा दिली जाते. ग्रंथालय आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिकाधिक दृढ करण्यासाठी ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवली जाते. दरवर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलर कार्डद्वारे दोन पुस्तके घेण्याची सुविधा आहे. गेल्या २ वर्षांपासून महाविद्यालयातील आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी बुकबँक योजना राबविली जात असून त्याद्वारे आतापर्यंत १७४ विद्यार्थ्यांना ६२८ पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेच्या अंतर्गत विविध वाङ्मयीन प्रवाहातील शंभर पुस्तके विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची जोपासत आहेत. डिजिटल ग्रंथालयाच्या धर्तीवर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने ब्रिटिश लायब्ररीचे सदस्यत्व घेऊन ७० हजार ई-बुक्स वाचनासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक वापराकरिता आय.टी. लॅबमध्ये मोफत इंटरनेट सुविधा आणि दोन किंडल ई बुक्ससुद्धा विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध आहेत. ग्रंथालयातर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संतपरंपरा आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखकांची माहिती हस्तलिखिताद्वारे प्रकाशित केली जाते. वाचन चळवळीस चालना देण्यासाठी वर्षांअखेरीस चौफेर आणि अवांतर वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांस ‘आदर्श वाचक पुरस्कार’ ग्रंथालयातर्फे दिला जातो.