‘सहा शब्दांची गोष्ट’ महाविद्यालयीन प्रकल्पातही
मानसी जोशी, युवा वार्ताहर
मनातील भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा प्रभावी उपयोग होत असतो. भाषेला जोड मिळते ती शब्दांची. अलीकडे सोशल मीडियाच्या महाजालात तरुण पिढी भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा प्रभावी उपयोग करतात. नवीन शब्द शोधून काढतात. जलद युगात वेळ वाचवण्यासाठी संवाद साधतानाही तरुण अनेक शॉर्टकट्सचा उपयोग करतात. या शॉर्टकट्सपैकी सध्या सोशल मीडियावर गाजत असलेली पद्धत म्हणजे माय सिक्स वर्ड स्टोरी.. विशेष म्हणजे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली ही सिक्स वर्ड स्टोरीची ही कल्पना महाविद्यालयीन प्रकल्पांमध्येही पाहायला मिळत आहे.
तरुणांच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या स्टेट्सवर या सहा शब्दांची गर्दी पाहायला मिळते. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ मांडण्याचा हा प्रयत्न महाविद्यालयीन तरुणांमध्ये अधिकाधिक दिसून येत आहे. कमी शब्दांत भावना व्यक्त करणे हे काही नवीन नाही. मात्र सहा शब्दांच्या जागेत अर्थ मांडण्याचा ट्रेंड नव्याने तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध कथालेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी लिखाणाच्या या प्रकाराची सुरुवात केली. लोकांनाही हे लिखाण आवडले, रुचले. तेव्हापासून या लिखाणाला लोकांची पसंती मिळू लागली. हे सहा शब्द लिहिताना ते अर्थपूर्ण आणि एकमेकांशी संबंधित असायला पाहिजेत ‘तो आला, त्याने पाहिले आणि जिंकला’, ‘तो येतो पाहतो आणि घुसमटून जातो,’ अशा शब्दांत ही सिक्स वर्ड स्टोरी सांगितली जाते. केवळ मनोरंजन नव्हे तर सहा शब्दांच्या अर्थातून तरुणांमध्ये सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले जात आहे.
सहा शब्दांची कथा प्रकल्पातही
महाविद्यालयीन तरुणांमध्ये प्रिय असलेली सहा शब्दांची कथा अभ्यासाचाही भाग बनली आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालयामध्ये जाहिरातीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या संकल्पनेवर आधारित प्रकल्प देण्यात आले आहेत. अभ्यासात सर्जनशीलतेला वाव मिळाल्यावर कठीण अभ्यास सोपा वाटतो. सिक्स वर्ड स्टोरीचा नवा ट्रेंड महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दिल्याने अभ्यास रटाळ वाटत नाही. सिक्स वर्ड स्टोरीच्या अंतर्गत स्वत:ची कथा तयार करून चित्र काढण्याचे प्रकल्प देण्यात आले आहेत, असे जुईली जोशी हिने सांगितले.
जोशी–बेडेकर महाविद्यालयात ‘युथ’ पारितोषिक वितरण समारंभ
प्रशांत कापडी, युवा वार्ताहर
विद्यार्थ्यांनी सर्वागीण विकासाच्या दृष्टीने कला प्रकारातही प्रावीण्य मिळवावे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी युथ फेस्टिवल आयोजित करण्यात येते. जोशी-बेडेकर महाविद्यालयात २०१५-१६ वर्षांत या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच महाविद्यालयात पार पडला. मुंबई विद्यापीठाचे विभागीय पदक पटकावण्याचे जोशी-बेडेकर महाविद्यालयाचे हे तिसरे वर्ष आहे. पारितोषिक वितरण समारंभासोबतच या वर्षीच्या स्पर्धेच्या जोरदार तयारीसाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची लगबग पाहायला मिळत आहे.
४८व्या युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यलयाच्या कात्यायन सभागृहात पार पडला. या वेळी एकपात्री अभिनयासाठी दिव्या मोहिते या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांक, ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेत मयूर तायडे याला तृतीय क्रमांक, तन्वेषा पांडे हिला पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, व्यंगचित्र स्पर्धेत कश्मिरा गुजर हिला द्वितीय क्रमांक, प्रज्ञा पोवळे हिला मराठी वक्तृत्व स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत सागर रणशूर याला द्वितीय क्रमांक, कथालेखनासाठी ऋषिकेश मुळे याला उत्तेजनार्थ, वादविवाद स्पर्धेसाठी पंकज चव्हाण याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. युथ फेस्टिवलच्या प्रमुख प्रा. मृण्मयी थत्ते, प्रा. शिवाजी नाईक व प्रा. अर्चना प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या ४९व्या युथ फेस्टिवलसाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या वेळी ४८व्या युथ फेस्टिवलमध्ये महाविद्यालयाला मिळालेले पदक महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये खूप वैविध्यपूर्ण कौशल्ये असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम महाविद्यालय अतिशय काळजीपूर्वक करत असते आणि त्याचे फळ विद्यार्थी स्पर्धामध्ये सहभागी होऊन नामांकने मिळवत असतात. त्याचसोबत महाविद्यालयाचे नाव मोठे करीत असतात, असे सांगत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण याने केले. कार्यक्रमाची सांगता मयूरी रेडीज या विद्यार्थिनीने आभारप्रदर्शनाने केली.
मानसशास्त्र प्रात्यक्षिक पुस्तक बांदोडकरमध्ये प्रकाशन
प्रतिनिधी, ठाणे
‘सायकॉलॉजी प्रॅक्टिकल बुक फॉर एसवाय बीएस्सी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच बांदोडकर महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात आयोजित एका समारंभात झाले. बांदोडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सी.जी. पाटील आणि मुंबई विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अभ्यासमंडळाच्या अध्यक्ष डॉ. स्मिता दुर्वे या वेळी उपस्थित होते. मिठीबाई महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. विनायक दळवी आणि डॉ. विंदा मांजरमकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
विद्यार्थ्यांनी पुस्तके चौकस नजरेने वाचावीत व त्यामधील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात, असे डॉ. दुर्वे यांनी या वेळी सांगितले. एस.वाय.बी.एस्सी.साठी प्रकाशित करण्यात आलेल्या मानसशास्त्राच्या या प्रात्यक्षिक पुस्तकामध्येही काही उणिवा राहून गेल्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांना कळवाव्यात, जेणेकरून पुढील आवृत्तीमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या या उपक्रमात बांदोडकर महाविद्यालयाच्या डॉ. विंदा मांडरमकर यांनी पुस्तकाचे लेखन केल्यामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले, असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर न्यायते यांनी या वेळी बोलताना काढले. या कार्यक्रमाला मुंबई, ठाणे व भिवंडी येथील महाविद्यालयांचे प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
वंदे मातरम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
कोपर येथील जान्हवी मल्टी फाऊंडेशनच्या वंदे मातरम महाविद्यालयातदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार कोल्हे सर यांच्या हस्ते गुणगौरवात्मक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रीतम महाजन या विद्यार्थिनीला ९४ टक्के तर मुलांमधून सुमीत शेलार या विद्यार्थ्यांस ९२ टक्के गुण मिळाले. या दोघांसह अन्य विद्यार्थ्यांचाही सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांची ध्येय उच्च ठेवायला हवीत, त्याच ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला हवी, असा सल्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला. या सोहळ्यात महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विवेक पाटील, प्रेरणा कोल्हे, प्रीती महाजन, वनिता लोखंडे आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
राष्ट्रीय शिक्षण परीक्षेत वैभवी नागतोडेला सुवर्णपदक
बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी ठाण्यात अव्वल
ऋशिकेश मुळे, युवा वार्ताहर
गोव्याच्या ‘मिप्फी’ विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंट टॅलेंट सर्च’ या परिक्षेत विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी नागतोडे हिने ठाणे जिल्ह्य़ातून सुवर्णपदक पटकावले आहे.
संपूर्ण भारतात एकाच वेळी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. भारतातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यातून ठाणे जिल्ह्य़ातून बांदोडकर महाविद्यालयाची वैभवी ही प्रथम आली. सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन वैभवीचा गौरव करण्यात आला. गेल्या सात वर्षांपासून बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय या परीक्षेत आपला ठसा उमटवून पर्यावरणासंबंधी आपली बांधिलकी जपत आहे, असे महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रा. अनिल आठवले यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर न्यायते व उपप्राचार्य प्रा. पाटील यांनी वैभवी नागतोडे हिला यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाने सर्वाधिक सहभाग दर्शवला. या परीक्षेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रा.अनिल आठवले यांना रजतपदक ‘मिप्फी’ने बहाल केले.