ठाणे : ठाणे महापालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीसाठी ६३१ वृक्ष तोडण्याचा तर दोन हजार ९७ वृक्षांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव वादग्रस्त ठरला असतानाच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेला ठाणे शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या दुभाजकांमध्ये काँक्रीटचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. हा काँक्रीटच्या थर तेथील झाडांच्या मुळावर येऊन हा हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

वर्तकनगर यथील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. यासाठी येथील ६३१ वृक्ष तोडण्याचा तसेच दोन हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपन करण्याचा ठाणे महापालिकेने प्रस्ताव तयार केला असून त्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध करत पालिकेकडे हरकती नोंदविल्या आहेत. यामुळे हा प्रस्ताव वादग्रस्त ठरला असतानाच, त्यापाठोपाठ आता महामार्गालगतचा हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे शहरातून पुर्व द्रुतगती महामार्ग जातो. हा मार्ग पुढे मुंबई-नाशिक आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात आलेला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक वृक्ष आहेत. याशिवाय, या मार्गाच्या मधोमध दुभाजकांमध्येही वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.

या दुभाजकांमध्ये असलेले काँक्रीट काढण्यात येत असून तो या दुभाजकातील मातीवरच टाकण्यात आलेला आहे. काही ठिकाणी काँक्रीटच्या गोण्यांचे ढिग लावण्यात आलेले आहेत. मातीवर जमा झालेल्या या काँक्रीटच्या थरामुळे तेथील वृक्षांना धोका निर्माण होऊन तीन नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेने मात्र हा रस्ता आपल्या अखत्यारित नसल्यामुळे तिथे पालिकेमार्फत काम सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर हा रस्ता एमएमआरडीए विभागाच्या अखत्यारित असल्यामुळे या विभागाचे अभियंता गुरुदत्त राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन कळवितो असे त्यांनी सांगितले.

ठाणे शहरातून जाणारा द्रुतगती महामार्ग हा एमएमआरडीएच्या अखत्यारित येतो. या मार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पाथ्याशी रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक आधी झिकझ्याक पद्धतीचा होता. त्यातच वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर या दुभाजकाच्या दोन्ही बाजूने नवीन दुभाजक बसवून तो दोन्ही बाजून बंदिस्त करण्यात आला. त्यावर माती टाकण्यात आलेली होती. मात्र, त्यावेळी झिकझ्याक पद्धतीने बसविण्यात आलेला दुभाजक काढून टाकण्यात आला नव्हता. तो काढून टाकण्याचे काम याठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे मातीमध्येच असलेले काँक्रीट काढताना त्याचा थर मातीवर पसरल्याचे दिसून येत आहे. परंतु या नियोजनशुन्य कारभाराचा फटका येथील वृक्षांच्या मुळावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

Story img Loader