ठाणे : महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा गुंडांशी संबंध असल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता, अवैधरीत्या मिळालेली बढ़ती, अनधिकृत बांधकामप्रकरणी सुरु असलेली चौकशी आणि अवैधरीत्या वितरीत केलेल्या सदनिका याबाबत चौकशी करण्यास पालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आणि पोलीस आयुक्तांना स्मरणपत्र देऊन कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी एका गुंडामार्फत धमकविल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी केला होता. याप्रकरणी त्यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर काहीच कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना स्मरणपत्र दिले आहे. त्यात जे जे हॉस्पिटल हत्याकांडात १९९२ सप्टेंबर २०२२ मध्ये दोन पोलिसांची झालेली हत्या व उल्हासनगर येथील घनश्याम भटीजा (१९९०) इधर भटीजा हत्या प्रकरणात झालेल्या दोन पोलिसांची हत्या प्रकरणातील दोषी सिद्ध झालेल्या कुविख्यात गुंडाबरोबर सबंध ठेवून त्याच्या मदतीने ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या मनपा सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई होण्यास होत असलेली दिरंगाई म्हणजे पोलीस खात्यास शरमेने मान खाली घालण्यासारखी आहे. पोलिसांची हत्या करण्याऱ्यांवर जर पोलीस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असतील तर हा सामान्यां बरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा अन्याय आहे. त्यामुळे अशा मुजोर कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाईचा बडगा उभारावा व त्या मयत पोलिसांच्या कुटुंबास न्याय द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
विक्रांत चव्हाण यांनी अशाचप्रकारे ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनाही समरण पत्र दिले आहे. त्यात महेश आहेर यांची शैक्षणिक अर्हता, महापालिका भवनात बसून पैसे मोजणे आणि पैशांसोबत फोटो काढणे, अवैध मालमत्ता बाळगणे, अवैधरीत्या मिळालेली बढ़ती, अनधिकृत बांधकामप्रकरणी सुरु असलेली चौकशी, अवैधरीत्या वितरीत केलेल्या सदनिका, अनैतिक संबंधातून झालेली अपत्य व त्यांना दिलेले वडील म्हणून स्वःताचे नाव व देत असलेले शिक्षण, अनैतिक संबंध ठेवून बेकायदेशीरपणे बाळगलेली दुसरी बायको व तिच्या नातेवाईकांच्या नावे केलेली महापालिकेच्या सदनिका, स्वतः जवळ बाळगलेली जंगम व स्थावर मालमत्ता, कर्मचाऱ्यांना दिलेली धमकी प्रकरणे या सर्व बाबीबाबत पुराव्यानिशी तक्रारी करून सुद्धा जर प्रशासन यात चौकशी करत नसेल तर हि बाब
दुर्दैवी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यामध्ये तातडीने लक्ष घालून युद्ध पातळीवर निष्कर्ष कडून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.