ठाणे : सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांनाही ठाणे पोलिस सरंक्षण पुरवित असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून त्यापाठोपाठ आता या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकाला ज्याप्रमाणे पोलिस संरक्षण देण्यात येते, त्याचप्रमाणे आमच्या पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’; आनंद परांजपे यांची अटक व सुटका
काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाण्यात नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकाला पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे आमच्या पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमचे पदाधिकारी सुद्धा आंदोलने करीत असून त्याचबरोबर विरोधाची भुमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे चव्हाण यांनी सांगितले. मुंबईच्या हद्दीत जाताना टोल माफ करण्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीही यापुर्वी आंदोलन केले होते, परंतु अद्यापही टोलमाफी झालेली नाही. त्यामुळे किमान ठाणेकरांसाठी तरी ही टोलमाफी मिळावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत वर्दळीच्या रस्त्यांवरील हातगाड्यांमुळे वाहन कोंडी
ठाणे शहरातील स्मशानभुमीत अद्यापही मोफत लाकडे उपलब्ध होत नाहीत. इतर महापालिकांनी मोफत लाकडांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडेल म्हणून ठाणे महापालिकेने अद्यापही यावर निर्णय घेतलेला नाही. वास्तविक पाहता या संदर्भातील ठराव देखील मंजुर आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सत्तेत आल्यावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी लागू केली जाईल असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. मात्र केवळ सामान्य कर माफ करण्यात आलेला आहे. परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने त्यांनी सरसकट ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्याची हिम्मत दाखवावी असेही ते म्हणाले. शहरात प्रत्येक प्रभाग समितीत शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी. त्यानुसार शहरात किमान आणखी १ हजार नवीन शौचालये उभारण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.