ठाणे : काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे काँग्रेस शहर पदाधिकाऱ्यांची बैठक आज, शुक्रवारी मुंबईतील कार्यालयात बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावाही घेतला जाणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले. यामुळे विधानसभा निवडणुकाही महाविकास आघाडीत लढविण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. असे असले तरी या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणीचे काम सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे काँग्रेस शहर पदाधिकाऱ्यांची बैठक आज, शुक्रवारी मुंबईतील कार्यालयात बोलावली आहे. या बैठकीत त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असून यानिमित्ताने ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
हेही वाचा – कल्याणमधील वाढत्या चोऱ्यांनी दुकानदार त्रस्त
शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा तीन वर्षांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ गेल्यावर्षीच पूर्ण झाला असून तेव्हापासूनच त्यांच्या बदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच प्रदेशच्या बैठकीमुळे या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. परंतु या बैठकीनंतर चव्हाण हेच अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार की दुसऱ्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, हे स्पष्ट होईल.