ठाणे : येऊर भागात बेकायदा सुरु असलेल्या हाॅटेलमध्ये पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या सुरू असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला असतानाच, त्यापाठोपाठ आता येऊर बेकायदा बांधकामांचे आगार बनल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असलेल्या येऊरमध्ये तीनशेहून अधिक बेकायदा बंगले, हाॅटेल आणि खेळाचे टर्फ असून त्याचबरोबर महापालिका आणि महसुल विभागाने बांधकाम परवानगी दिलेले बंगलेही नियमानुसार बेकायदेशीर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या बंगल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
येऊर हे ठाण्याला मिळालेले वरदान आहे पण, मर्यादेच्याबाहेर गेल्यावर सर्वच गोष्टींचा ऱ्हास होतो. येऊरमध्ये दीडशेहुन अधिक बेकायदा हॉटेल्स असून त्याठिकाणी पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या सुरू असतात. याचा आता कुठेतरी अंत व्हायला हवा, असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले होते. येऊरमध्ये बेकायदा सुरू असलेले बारमध्ये मद्य, हुक्का विकला जातो, हे चित्र आम्हाला दिसते.पण, ज्यांना दिसायला हवे त्यांना ते कसे दिसत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे आणि बाळासाहेब भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन येऊर बेकायदा बांधकामांचे आगार बनल्याचा आरोप केला.
येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असून हे उद्यान तीन लाख एकर जागेत आहे. केंद्र शासनाने १९८३ मध्ये या उद्यानाची घोषणा केली. या ठिकाणी वायु दलाचे स्थानक आहे. अशा महत्वाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासींना उदारनिर्वाहकरिता केवळ शेती करण्याची परवानगी आहे. हा परिसर उद्यानाच्या अख्यारित असला तरी तेथील जमिनींवर आदिवासींचे कुळ आहे. या जमिनी घेऊन त्यावर बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्यात बंगले, हाॅटेल, लग्न सोहळ्याचे सभागृह आणि खेळाचे टर्फचा समावेश असून याठिकाणी पुर्वी असलेले वृक्षही नष्ट झाले आहेत, असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. आदीवासींच्या नावाखाली बंगले, हाॅटेल, लग्न सोहळ्याचे सभागृह आणि खेळाचे टर्फपर्यंत रस्ते बनविण्यात आलेले असून त्याठिकाणी पाणी सुविधाही देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> बिअर दिली नाही म्हणून डोंबिवलीत हॉटेल मालकाला ठार मारण्याचा प्रयत्न
पण, स्थानिक आदिवासी मात्र पाणी सुविधेपासून वंचितच आहेत. हाॅटेलमध्ये बेकायदा मद्य विक्री केली जात आहेत. त्यामुळे पालिकेसह इतर विभागांनी या सर्व बांधकामांना सर्व प्रथम टाळे लावून त्यानंतर ते भुईसपाट करावे अशी मागणी करत यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गुंड टोळ्या कार्यरत
आदीवासी बांधवांना पुढे करून काही गुंड टोळ्या तेथील जमीनींवर कब्जा करीत आहेत. या जमिनी ताब्यात आल्यानंतर त्यावर विविध विभागांची परवानगी घेऊन बांधकामे करण्यात येत आहे. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरु झाला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.