ठाणे महानगरपालिकेचा २७३० कोटींचा अर्थसंकल्प महापौर संजय मोरे यांनी बुधवारी ३० मार्चला मंजूर केला.
या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षांव केला. या कौतुकाला उत्तर देताना आयुक्तांनी मात्र सर्व ठाणेकरांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले, असे सांगत सभागृहात ठाणेकरांचे आभार मानले. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाणे शहरात काम करणे हे आव्हान असल्याचे सांगत हे आव्हान आपण स्वीकारले. झपाटय़ाने विकसित होणाऱ्या या शहरात नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचा प्रमुख या नात्याने सर्वप्रथम काय करता येईल याचा सर्व आराखडा तयार केला. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढविता येईल या दृष्टीने सर्वप्रथम मालमत्ता कर वसुली, पाणीपट्टी वसुली कशी करता येईल याबाबत नियोजन केले. अर्थसंकल्पही सर्वसमावेशक केल्यामुळे तो सर्वाच्याच पसंतीस उतरला, त्यानंतर रस्तारुंदीकरणासाठी सर्व रस्त्यांची पाहणी करून रस्तारुंदीकरणात विस्थापितांच्या पुनर्वसनाची सोय करूनच रस्तारुंदीकरणाची मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.
आयुक्तांच्या या कामाच्या कौतुकाचा उल्लेख अर्थसंकल्पीय सभेत सर्वच नगरसेवकांनी केला, तेव्हा मात्र आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कौतुकास ठाणेकर तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवक पात्र असून हे श्रेय त्यांचे असल्याचे खुल्या दिलाने नमूद केले. जर नागरिकांनी सहकार्य केले नसते तर मी काहीच करू शकलो नसतो, अशी प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली.
रस्तारुंदीकरणात महत्त्वाचा वाटा असलेले तत्कालीन आयुक्त टी. चंद्रेशखर यांचाही उल्लेख या वेळी करण्यात आला. मात्र टी. चंद्रशेखर यांची बरोबरी मी करू शकत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
मंगळवार, बुधवार दोन दिवस ठाणे महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर केलेली चर्चा नमूद करत, आपल्या भाषणात प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेल्या कामांचा उल्लेख करणारे हे पहिलेच आयुक्त असावेत. त्यामुळे एक प्रशासनप्रमुख कसा असावा याची प्रचीती लोकप्रतिनिधी तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांना आली.
संजीव जयस्वाल हे ठाणे महापालिकेचे २९ वे आयुक्त आहेत. परंतु गेल्या २८ वर्षांत नागरिकांच्या नजरेस न आलेली अनेक कामे त्यांनी ठाण्यात करून प्रत्येक ठाणेकराचा दुवा मिळविला आहे. रस्तारुंदीकरणानंतर खऱ्या अर्थाने ठाणेकरांनी मोकळा श्वास घेतला तेव्हा मात्र प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा होती, ती म्हणजे आयुक्त संजीव जयस्वाल ‘सिंघम’ आहेत याची. याबाबतचीदेखील सभेत लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. त्या वेळी मी सिंघम वगैरे नसून मी माझे कर्तव्य बजावत आहे. शहर कसे असावे, शहराचा प्रशासनप्रमुख म्हणून नागरिकांना कोणत्या सोयीसुविधा देता येतील याचा विचार मी करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांशी प्रत्येक गोष्टीबाबत चर्चा करून त्याचा पाठपुरावा करणे, व्हॉट्सअ‍ॅप वरून सर्व माहिती घेणे, अपडेट्स ठेवणे व कामांमध्ये जातीने लक्ष घालणारे हे आयुक्त पहिलेच असावेत, त्यामुळेच ठाणेकरांनादेखील त्यांचे काम पसंतीस उतरले आहेत.
आपण फार कोणी मोठे नसून एक सरकारी अधिकारी आहोत, शहराच्या सेवेसाठी आपली नियुक्ती झाली असून, आपण आपले काम करीत आहोत, मात्र हे करणे शक्य झाले ते केवळ ठाणेकरांमुळेच असे वारंवार सांगत आयुक्तांनी सभागृहात हा ठाणेकरांचा विजय असून ठाणेकरांचे सहकार्य मला असेच मिळाले तर भविष्यात निश्चितच ठाणे शहर ‘स्मार्ट’ होणार आहे असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Story img Loader