ठाणे शहरातील सर्वसाधारण कुटुंबातील रुग्णांना खासगी रुग्णालयातील महागडी डायलिसिसची सुविधा मोफत मिळावी, यासाठी महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांत पाच ठिकाणी नवीन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवल्यानंतर याव्यतिरिक्त आणखी काही केंद्रे सुरू करावीत का याचा विचार आयुक्त स्तरावर सुरू करण्यात आला आहे.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वादग्रस्त ठरलेल्या डायलिसिस केंद्राची सविस्तर माहिती घेऊन तेथे रुग्णांना चांगली सुविधा कशी मिळेल, याचाही नव्याने अभ्यास सुरू  करण्यात आला आहे. नागपूरच्या धर्तीवर ठाणे शहरात डायलिसिस केंद्रासाठी स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते का, याचाही अभ्यास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केला आहे.
कळवा रुग्णालयात महापालिकेचे एकमेव डायलिसिस केंद्र असल्याने शहरातील अन्य भागातील रुग्णांना येथे उपचार घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. ही सुविधा स्वस्तात मिळविण्यासाठी या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सर्वच रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घोडबंदर, लोकमान्यनगर, हिरानंदानी मेडॉज, टेंभीनाका आणि मुंब्रा-कौसा या पाच ठिकाणी नवीन डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा विचार महापालिकेने केला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. खासगी संस्थेमार्फत ही केंद्रे चालविण्यात येणार असून डायलिसिसच्या दराकरिता स्वतंत्र धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. टी. केंद्रे यांनी दिली.

कसे असतील दर?
या धोरणाअंतर्गत या सुविधेचे तीन विभागांत दराचे वर्गीकरण करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल अशा रुग्णांना ही सुविधा मोफत मिळणार आहे. वर्षांला साडेचार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर सुविधेत ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच साडेचार लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांकडून संपूर्ण पैसे घेतले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. केंद्रे यांनी दिली.

वादग्रस्त केंद्रावर आयुक्तांची नजर
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एकमेव डायलिसिस केंद्र असून ते खासगी संस्थेमार्फत चालविण्यात येते. या केंद्रामध्ये महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप यापूर्वी नगरसेवकांनी केला आहे. तसेच हे डायलिसिस केंद्र पूर्णवेळ सुरू नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी नगरसेवकांकडे केल्या आहेत. त्यामुळे या केंद्रावर महापालिका आयुक्तांची नजर असणार आहे.

Story img Loader