Marathi Actor Ketaki Chitale Bail: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने केतळी चितळेला जामीन मंजूर केला आहे. महिन्याभरापासून ती कारागृहात होती. १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे कळव्यात एफआयआर दाखल करुन घेतल्यानंतर केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती.
टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.
न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर केतकीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. अखेर महिन्याभरानंतर ठाणे न्यायालयाने तिला याप्रकरणात जामीन मंजूर केला आहे.