राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (१२ नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायालयासमोरील रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. त्यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळेत कामानिमित्ताने ठाणे स्थानक, कोर्टनाका, जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जितेंद्र आव्हाड पोलीस तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा दावा केला. तसेच आव्हाडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणी घेताना न्यायाधीश बी. एस. पाल यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट बंड पाडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ ते १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. शनिवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांचे सहकाऱ्यांना हजर करण्यात आले.

आव्हाड यांच्या समर्थनार्थ न्यायालय परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचं नेमकं प्रकरण काय?

हा सगळा वाद सुरू झाला ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे. अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या या चित्रपटामध्ये शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारतोय. याशिवाय इतरही अनेत दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटामध्ये आहेत. स्वराज्याचे एक वीर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेचा पट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील काही संवाद आणि चित्रपटातील काही दृष्य यांच्यावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून तो प्रेक्षकांसमोर मांडला जात असल्याचा दावा आक्षेप घेणाऱ्यांकडून करण्यात आला.

चित्रपटावर आक्षेप काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच या चित्रपटातील काही संवादांना आणि दृश्यांना विरोध केला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांना पाठिंबा देत जितेंद्र आव्हाडांनीही चित्रपटाच्या विरोधी भूमिका घेतली होती.

“या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं आहे ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याबरोबर विरोधात चित्रपटामध्ये आलं आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकणा असा मावळा कधी होता?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला होता. “शिवाजीमहाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय. तसेच, बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांशी लढायला गेले होते असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. पण हे इतिहासात कुठे दिसलं? बाजीप्रभू हा शिवाजी महाराजांचा सच्चा सेवक होता”, असंही आव्हाडांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

विवियाना मॉलमध्ये वाद पेटला!

सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी यावरून ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मोठा वाद निर्माण झाला. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये सुरू असताना रात्री १० च्या सुमारास गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करून त्यांना बाहेर काढल्याचा आरोप मनसेनं केला. तर वाद घालणाऱ्या प्रेक्षकानं मद्यप्राशन केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शो सुरू असतानाच विवियाना मॉलमध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काही प्रेक्षकांना मारहाण झाल्याचाही आरोप झाला. मनसेकडून याविरोधात पोलिसांत दाद मागण्यात आली. यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शो बंद पाडून चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना हुसकावून लावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच, बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत मागितल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane court on ncp mla jitendra awhad bail application in beating case pbs