ठाणे : घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली नाही म्हणून नातेवाईकाची हत्या करणाऱ्या इंद्रमोहन मारमले बुढा (४४) याला ठाणे न्यायालयाने आजीवन कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०२१ मध्ये इंद्रमोहन विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. इंद्रमोहन हा मूळचा नेपाळ येथील असून तो मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

खारकर आळी येथील महाजनवाडी परिसरात एका गृहसंकुलात पदम बहादूर ठकुल्ला (४५) हे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. याच इमारतीतील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका खोलीत ते त्यांची पत्नी आणि मुलांसह राहत होते. पदम हे मूळचे नेपाळचे होते.

तर त्यांचा नातेवाईक इंद्रमोहन बुढा हा मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका गृहसंकुलात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो नेहमी पदम यांच्या घरी येत असे. ऑक्टोबर २०२१ मध्ये तो पदम यांच्या घरी आला. तसेच येथे निवाऱ्यासाठी आणि जेवणाची सोय करावी असे पदम यांना सांगू लागला. परंतु पदम आणि त्यांच्या पत्नीने त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्याला तेथून हाकलून दिले होते. याचा राग इंद्रमोहनच्या मनात होता. २२ ऑक्टोबर २०२१ ला दुपारी इंद्रमोहन हा पदम याच्या घरी आला. त्यावेळी पदम याची पत्नी कामाला गेली होती. इंद्रमोहन हा सुरा घेऊन पदमच्या घरात शिरला आणि त्याच्यावर सुऱ्याने वार केले. यावेळी झालेल्या झटापटीत इंद्रमोहन याच्याही पायाला देखील दुखापत झाली. पदम यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी पदम इमारतीच्या प्रवेशद्वारावर आला.

रहिवाशांनी त्याला उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा उपचारा दरम्यान मृ्त्यू झाला. याप्रकरणात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इंद्रमोहन याला अटक केली. पोलिसांनी साक्षीपुरावे गोळा करून इंद्रमोहन विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. मंगळवारी इंद्रमोहन याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी त्याला आजीवन कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून ए.पी. लाडवंजारी यांनी काम पाहिले. तर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी काम पाहिले.

Story img Loader