बदलापूरः करोनाच्या संकटात तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक विकासकामांना थांबवून रूग्णालये उभी केली. मात्र कोट्यावधी रूपयांच्या खर्चातून विकत घेण्यात आलेल्या खाटा, व्हेंटीलेटर, अतिदक्षता विभागातील महागडे साहित्य, गाद्या, टेबल – खुर्च्या, प्राणवायू सिलेंडर, पीपीई कीट असे असंख्य साधने सध्या धुळखात पडून आहेत. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील काही शासकीय रूग्णालयांमध्ये खाटा नसल्याने रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार देण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी निश्चित धोरण नसल्याचे सांगत पालिका प्रशासन या साहित्याला कुलूपबंद करून ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचा चुराडा होत असल्याने नागरिकही संताप व्यक्त होत आहेत.
करोनाच्या काळात शासकीय यंत्रणांनी रूग्णांना उपचार देण्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य केंद्र उभारली. समर्पित करोना रूग्णालयांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला. यातून पालिकांनी आपापल्या स्तरावर रूग्णालयासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली. यात रूग्णांसाठी खाटा, अतिदक्षता विभागासाठी विशेष खाटा, चादरी, गाद्या, पडदे, फर्निचर, टेबल – खुर्च्या, प्राणवायू सिलेंडर, पीपीई कीट, विविध प्रकारची तपासणी यंत्रे विकत घेण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत रेमडीसिव्हर औषधांची गरज भासली. त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोपही झाला. मात्र करोनाची लाट ओसरल्यानंतर ही आरोग्य केंद्र रिकामी झाली. त्याच्या साहित्याचे करायचे काय असा प्रश्न असल्याने पालिका प्रशानाने हे साहित्य गोदामांमध्ये भरून ठेवली आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने हे सर्व साहित्य बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रस्त्यावरील कोंडिलकर इमारतीत जमा करून ठेवल्याची बाब समोर आली आहे. येथे कोट्यावधी रूपयांचे साहित्य धुळखात पडून असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अंबरनाथ आणि जिल्ह्यातील इतर पालिकांचीही हीच स्थिती असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे अनेकांनी या काळात पुढे येत आपल्या खिशातून रूग्णालयांना मदत केली. अंबरनाथ, बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, सामाजिक संस्था यांनी पुढे येत पालिकेच्या खर्चात हातभार लावला. काही वैयक्तिक मदतही यावेळी करण्यात आली. काही व्यक्तींनी स्वतच्या पातळीवर पुढे येत रूग्णशय रूग्णालयांना देऊ केली. काहींनी बायपॅप यंत्रणाही दिली. मात्र ही सर्व यंत्रणा आता धुळखात पडून आहे. त्याचा उपयोग होत नसल्याने खंत व्यक्त होते आहे.
इच्छाशक्तीचा अभावआरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधील वस्तूंचे गरजेच्या ठिकाणी वितरण करण्यात आले. उल्हासनगरच्या शासकीय रूग्णालयाला याच पद्धतीने प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि खाटा मिळाल्या. पण पालिकेच्या अखत्यारितील आरोग्य केंद्रांचे साहित्य पडून असल्याने येथे इच्छा शक्तीचा अभाव आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
करोना काळात आम्ही उभारलेल्या रूग्णालयातील वापरण्यायोग्य प्रत्येक साहित्य वापरण्यात आले. जिल्हा रूग्णालयाची वाढती गरजेला त्याचा फायदा झाला. आम्ही इतर शासकीय रूग्णालयांना हे साहित्य वितरीत केले. – कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे</p>
या साहित्याचे नेमके काय करायचे याबाबत निश्चित धोरण नाही. आम्ही वरिष्ठ कार्यालयाला याबाबत विचारणा केली आहे. त्यावर अद्याप काही स्पष्टता नाही. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.
सध्या अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाची उभारणी प्रगतीपथावर आहे. अंबरनाथच्याा छाया रूग्णालय आणि बदलापुरच्या ग्रामीण रूग्णालयाची दर्जोन्नती केली जाते आहे. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात खाटा नसल्याने रूग्ण जमिनीवर झोपून उपचार घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी या साहित्याचा वापर होऊ शकतो.