कल्याण- बनावट कागदपत्रे, महारेराच्या बनावट नोंदणी क्रमांकाचा आधार घेऊन डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियांची ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकातर्फे चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ६५ भूमाफियांची विशेष पथकाने चौकशी केली आहे. या चौकशीत आणखी काही नावे पुढे आली आहेत, त्यांनाही तपास पथकाने चौकशीसाठी पाचारण करण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका प्रकरणात भोपर मधील शांतीनिकेतन कॉम्पलेक्सच्या आठ विकासकांना तपास पथकाने बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमवारी दिले.
हेही वाचा >>> अंबरनाथः मुख्यमंत्र्यांविरूद्ध घोषणाबाजी भोवली; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल
फौजदारी प्रक्रिया संहितेची १६० च्या नोटिसी अन्वये आठ विकासकांना समन्स बजावण्यात आले आहेत. मे. अनमोल असोशिएट्सचे विकासक आणि भागीदार धर्मेश सोनी, जयंतीलाल धनजी रिता, केतन क्रिष्णाजी वेलसरे, नरेंद्र अमृतलाल पोपट, पंकज अमृतलाल पोपट, हेमंत धिरेंद्र कोटक, धिरेंद्र गोविंदजी कोटक, अनिल धिरेंद्र कोटक (रा. बोरीवली) अशा आठ जणांना ठाणे गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त तथा तपास पथक प्रमुख सरदार पाटील यांनी हे समन्स बजावले आहेत.
या आठ विकासकांनी डोंबिवली जवळील भोपर गावातील सर्व्हे क्र. ३८-१, ३८-२, ३८-३, ३९, ४०, २३६-१ २३६-२. २३६-३, २३४-५. २५९ या सर्व्हे क्रमांकावरील दोन हजार २४९ चौरस मीटर भूखंडावर शांती निकेतन काॅम्पलेक्सची उभारणी केली आहे. हा गृहप्रकल्पाची उभारणी करताना विकासकांनी बनावट बांधकाम मंजुरी, बनावट शासकीय कागदपत्र तयार केल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मे. अनमोल असोशिएटच्या विकासक, भागीदारांची चौकशी तपास पथकाकडून केली जाणार आहे, असे पथकातील एका सुत्राने सांगितले.
तपास पथकाच्या आदेशावरुन आतापर्यंत ४० हून विकासकांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याशिवाय ३४ विकासकांच्या बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणी न करण्याचे आदेश तपास पथकाने नोंदणी उपमहानिरीकांना केले आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) डोंबिवलीतील ६५ पैकी ५२ बेकायदा इमारतींचे रेरा नोंदणीकरण रद्द केले आहे. २५ भूमाफियांना महारेरा प्राधिकरणाने कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलविले होते. परंतु, एकही भूमाफिया महारेरा न्यायिक प्राधिकरणासमोर हजर झाला नाही.
विधीमंडळात चर्चा
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांनी शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविला आहे. या प्रकरणातील सहभागी अधिकारी आणि याप्रकरणाची चौकशी आणि कार्यवाही प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील राही एन्टरप्रायझेस या गृहसंकुलाच्या बनावट बांधकाम मंजुऱ्या प्रकरणी कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांचा या बांधकाम प्रकरणात सहभाग आहे.