ठाणे येथील मनोरमानगर भागात शुक्रवारी रात्री उशिरा पत्नी बुद्धी (२४) हिच्यावर चाकूने वार करून पती अतुल रमेश त्रिभुवन (२७) याने शनिवारी पहाटे ठाणे रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चाकूच्या हल्ल्यामुळे जखमी झालेली बुद्धी हिचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कापुरबावडी येथील मनोरमानगर भागात दोन मुले आणि पत्नीसमवेत राहणारा अतुल याच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तसेच त्याचे वडील घरातून निघून गेले होते. त्यामुळे अतुल गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणतणावाखाली होता. शुक्रवारी रात्री अतुल आणि त्याची पत्नी बुद्धी यांच्यात झालेल्या वादातून त्याने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. रक्ताच्या डागामुळे माखलेला शर्ट भिंतीला अडकवून शनिवारी पहाटे ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ६ वरील एक्स्प्रेस गाडीखाली अतुलने आत्महत्या केली. ठाणे रेल्वे पोलिसांना अतुलच्या खिशातून मिळालेल्या घरमालकाच्या दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे रेल्वे पोलिसांनी त्या क्रमांकावर फोन करून त्याच्या घरमालकाला घडलेला प्रकार कळविला. घरमालकाने त्याच्या शेजारीच राहत असलेल्या अतुलच्या आत्याला घडलेला प्रकार सांगितला. तिने अतुलच्या घराकडे धाव घेतली असता एका चादरीत बुद्धी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. आत्याने कापुरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला असता पोलिसांनी बुद्धी हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे, अशी माहिती कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा