डोंबिवलीजवळील मानपाडा गावातील एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या भागात काम करणाऱ्या दोन मजुरांनी काल सामूहिक बलात्कार केला. या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात शुक्रवारी हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मानपाडा गावातील एका अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळेत नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. ही मुलगी राहत असलेल्या तिच्या घराच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे हजामात अली, खुर्शीद आलम हे दोन तरुण प्लॅस्टर ऑफ पॅरिस व इतर इमारत सुशोभीकरणाचे काम करीत होते. ते काही दिवसांपासून अल्पवयीन मुलगी शाळेत कधी जाते, तेथून कधी परत येते अशा प्रकारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. ही मुलगी काल रात्री घराबाहेर पडताच टपून बसलेल्या या तरुणांनी तिला घरात शिरण्यापूर्वी अडवले. तिला त्यांनी ते काम करीत असलेल्या इमारतीच्या एका खोलीत नेले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या दोघांच्या तावडीतून मुलीने सुटका करून घेतली. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी या दोघांनी दिली होती. मुलीने पालकांना घडला प्रकार सांगितला. मुलीचे वडील पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी करू लागले. याची चाहूल या दोन्ही तरुणांना लागली. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून पळ काढला. ते राहत असलेल्या मुंब्रा या ठिकाणी लपून बसले. तेथून उत्तर प्रदेशातील बुऱ्हाणपूर या मूळ गावी पळून जाण्याची तयारी करू लागले. मानपाडा पोलिसांनी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या संदेश लहरींप्रमाणे माग काढला.
‘आरोपींची वकीलपत्रे घेऊ नका’
‘एका अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळेत पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या या दोन्ही आरोपींचे वकीलपत्र कल्याण न्यायालयातील कोणीही वकिलाने घेऊ नये, अशी मागणी मनसेच्या कल्याण जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे, स्वाती कदम, शीतल देवळालकर यांनी फौजदार वकील संघटनेचे सचिव अॅड. व्ही. एन. लांडगे यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शिक्षा होत नाहीत तोपर्यंत ही प्रवृत्ती नष्ट होणार नाही. यासाठी वकील संघटनेने सहकार्य करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर शुभांगी राणे, प्राची मोरे, सुनीता शेलार यांच्या सह्य़ा आहेत.
कल्याणमध्ये मुलीवर बलात्कार
कल्याण : डोंबिवलीत दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी कल्याणमधील सूचकनाका येथे भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बहिणीला बेदम मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देऊन भाऊ बहिणीवर बलात्कार करीत होता. कोळसेवाडी पोलिसांनी भावाला अटक केली आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील सूचकनाका येथे पंधरा वर्षांची पीडित बहीण आपले आई, वडील व १७ वर्षांच्या भावासह राहते.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी भावाने अल्पवयीन बहिणीला पट्टय़ाने बेदम मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याविषयी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
घरफोडीच्या दोन घटना
ठाणे : चंदनवाडी परिसरात राहणारे नरेश श्रीचंद्र डेमब्ला यांच्या घरी शनिवारी चोरी झाली. कुलुप कोयंडा तोडून चोरटय़ाने नरेश यांच्या घरात प्रवेश करुन विदेशी घडय़ाळे, सोन्याचे दागिने असा ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत रविवारी डोंबिवली पूर्व येथील मिलापनगर परिसरात राहणारे सुजित काशीनाथ ताबंट यांच्या घरी चोरी झाली. चोरटय़ाने ताबंट यांच्या घरातील एक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरला.
कल्याणमध्ये दोन मोटारसायकलची चोरी
कल्याण : येथील शास्त्रीनगर परिसरात राहणारे योगेश लक्ष्मण पवार (३२) यांची शनिवारी कल्याण रेल्वे ऑफिस क्वार्टस परिसरातून ५८ हजारांची मोटारसायकल चोरटय़ाने चोरली. दुसऱ्या घटनेत लालचौकी परिसरात राहणारे अवधुत बाबुराव वनकुंद्रे (३९) यांची मंगळवारी गुरुदेव हॉटेल येथून दहा हजारांची मोटारसायकल चोरटय़ाने चोरुन नेली. या दोन्ही गुन्ह्य़ांप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे परिवहन बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
ठाणे :वागळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालयासमोर भरधाव टीएमटी बसच्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विनायक मारुती आचरे (२०) असे असून तो किसननगर येथील राहणारा आहे.
वृंदावननगर येथून लोकमान्य नगरच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसने रोड नंबर १६ येथील पासपोर्ट कार्यालयासमोर एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये किसननगर येथे राहणाऱ्या विनायक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये आणखी एक तरुण जखमी झाला असला तरी त्या तरुणाचे नाव समजू शकले नाही. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.