डोंबिवलीजवळील मानपाडा गावातील एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या भागात काम करणाऱ्या दोन मजुरांनी काल सामूहिक बलात्कार केला. या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात शुक्रवारी हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मानपाडा गावातील एका अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळेत नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. ही मुलगी राहत असलेल्या तिच्या घराच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे हजामात अली, खुर्शीद आलम हे दोन तरुण प्लॅस्टर ऑफ पॅरिस व इतर इमारत सुशोभीकरणाचे काम करीत होते. ते काही दिवसांपासून अल्पवयीन मुलगी शाळेत कधी जाते, तेथून कधी परत येते अशा प्रकारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. ही मुलगी काल रात्री घराबाहेर पडताच टपून बसलेल्या या तरुणांनी तिला घरात शिरण्यापूर्वी अडवले. तिला त्यांनी ते काम करीत असलेल्या इमारतीच्या एका खोलीत नेले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या दोघांच्या तावडीतून मुलीने सुटका करून घेतली. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी या दोघांनी दिली होती. मुलीने पालकांना घडला प्रकार सांगितला. मुलीचे वडील पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी करू लागले. याची चाहूल या दोन्ही तरुणांना लागली. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून पळ काढला. ते राहत असलेल्या मुंब्रा या ठिकाणी लपून बसले. तेथून उत्तर प्रदेशातील बुऱ्हाणपूर या मूळ गावी पळून जाण्याची तयारी करू लागले. मानपाडा पोलिसांनी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या संदेश लहरींप्रमाणे माग काढला.
‘आरोपींची वकीलपत्रे घेऊ नका’
‘एका अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळेत पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या या दोन्ही आरोपींचे वकीलपत्र कल्याण न्यायालयातील कोणीही वकिलाने घेऊ नये, अशी मागणी मनसेच्या कल्याण जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे, स्वाती कदम, शीतल देवळालकर यांनी फौजदार वकील संघटनेचे सचिव अॅड. व्ही. एन. लांडगे यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शिक्षा होत नाहीत तोपर्यंत ही प्रवृत्ती नष्ट होणार नाही. यासाठी वकील संघटनेने सहकार्य करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर शुभांगी राणे, प्राची मोरे, सुनीता शेलार यांच्या सह्य़ा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा