ठाणे : ठाण्यातील एका तरुणीच्या हत्या प्रकरणी मारेकरी आकाश पवार याला ठाणे न्यायालयाने आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये एकतर्फी प्रेमातून आकाश पवार याने भररस्त्यात तरुणीची चाकूने हल्ला करून हत्या केली होती.
ठाण्यातील एका महाविद्यालयात तरुणी शिकत होती. ४ ऑगस्ट २०१८ या दिवशी सकाळी ११ वाजता ती पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना आकाश पवार याने तिला भर रस्त्यात गाठले. आकाश पवार हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यास नकार दिल्याने आकाश याने तिच्यावर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आकाश पवार याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात ठाणे सत्र न्यायालयात ३१ अक्टोबर २०१८ मध्ये नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन आहवाल, साक्षीदार यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून न्यायालयात आरोप पत्र सादर करण्यात आले.
हेही वाचा – भिवंडीतील गोदाम क्षेत्रात बिबट्या
हेही वाचा – कल्याणमध्ये श्वान, मांजर चावलेल्या तरुणाचा मृत्यू
या प्रकरणात सरकारी वकील ए.पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडताना भक्कम पुरावे, २१ साक्षीदार यांच्या जबाबासह पोलिसांनी मिळविलेले सीसीटीव्ही चित्रीकरण, साक्षीदारांचे जबाब सादर केले. त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायमूर्ती ए.बी. अग्रवाल यांनी आकाश पवार याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.