सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने विशेष मोहीम राबवत चोरांना जेरेबंद केले असले तरी ठाणे आणि कळव्यात सोमवारी पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घटल्याने या भागातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड येथे राहणाऱ्या सोनल शशिकांत पाटणे या रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील तीन हात नाका परिसरात गावी जाण्यासाठी खासगी कंपनीची बस गाठण्यासाठी उभ्या होत्या. तीन हात नाका परिसर हा रहदारीचा मानला जातो. असे असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या एका व्यक्तीने पाटणे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला. जवळच चोरटय़ाचे साथीदार त्याच्या मदतीसाठी मोटारसायकल घेऊन उभे होते. दुसऱ्या एका घटनेत मनीषानगर परिसरात राहणाऱ्या नूतन म्हात्रे या सकाळच्या वेळेत आपल्या मुलीस शाळेत सोडण्याकरिता जात होत्या. तेव्हा मोटारसायकलवरून वेगाने आलेल्या एका चोराने म्हात्रे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
भिवंडीत घरफोडी
भिवंडी : भिवंडी येथील समदनगर परिसरातील बैतुल अन्सार इमारतीत राहणाऱ्या डॉ. शबिना शकील शेख (३९) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा अज्ञात चोरटय़ांनी तोडून प्रवेश केला. कपाटातील ४ लाख ५० हजारांची रोख आणि अंदाजे ४ लाख १४ हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे ८ लाख ६५ हजारांचा माल चोरटय़ांनी चोरला. या प्रकरणी भिवंडी नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये दुकानात चोरी
कल्याण : कल्याण येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणारे व्यापारी भरत दिनेश पांडे (२९) यांच्या खडगोलवली भागातील दिनेश किराणा स्टोअर्स या दुकानात रविवारी रात्री सहा लाखांची चोरी झाली. दुकानाचे शटर उचकटून चोरटय़ांनी रात्री प्रवेश केला. पांडे यांच्या दुकानातील गल्ल्यातून चोरटय़ांनी रोख, कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा ६ लाखांचा ऐवज चोरला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2015 रोजी प्रकाशित
गुन्हेवृत्त : ठाणे-कळव्यात मंगळसूत्र खेचले
सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने विशेष मोहीम राबवत चोरांना जेरेबंद केले असले तरी ठाणे
First published on: 04-02-2015 at 12:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane crime news in short