ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन निकम यांनी रस्त्यावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना खोपट परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडली. मुंबईतील शीव रुग्णालयात त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काशिमीरा परिसरात बबन निकम राहत असून त्यांची बहीण ठाण्यातील खोपट परिसरात राहते. गुरुवारी सायंकाळी ते बहिणीला भेटायला आले होते. मात्र, त्यांची बहीण त्यांना घराबाहेरील रस्त्यावर भेटली. तेथून पायी घरी जात असताना त्यांनी आपल्याला जगायचे नाही, असे बहिणीला सांगितले आणि हातातील विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर बहिणीने नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून त्यांनी यापुर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

उल्हासनगरात सहा लाखांची घरफोडी
उल्हासनगर : येथील बाबा बेफिक्री चौकातील आकाशगंगा इमारतीत चंदरलाल वधारीया (६२) राहत असून गुरुवारी दुपारी त्याच्या घरात चोरी झाली. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या लाकडी दरवाजाची चौकट उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून सहा लाख २४ हजारांचा ऐवज लुटून नेला. यात सोन्याचे दागिने, एक लाख रुपयांची रोख रकम आणि मोबाइलचा समावेश आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरांचा धुमाकूळ
कल्याण : सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच मोटारसायकल चोरांनी कल्याण परिसरात धुमाकूळ घातला आहे. खडकपाडा येथे राहणारे रुपेश जाधव (३३) यांनी कल्याण स्टेशन रोड भागात उभी केलेली मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. भिंवडीत राहणारे निरज शांताराम दळवी (२४) यांनी खडकपाडा परिसरातील सिनेमॅक्स चित्रपटगृहासमोर मोटारसायकल उभी केली होती. ती चोरटय़ांनी चोरून नेली असून तिची किंमत सुमारे ४० हजार आहे. कल्याण पूर्व भागातील जय भवानी नगरमध्ये राहणारे दत्तात्रय हनुमंत वाघमारे (२५) यांची ५० हजार किमतीची मोटारसायकल काटेमानवली येथील भानू ज्योत रुग्णालयाच्या आवारातून चोरटय़ांनी  चोरली.

Story img Loader