मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलाच्या उतारावर भरधाव मोटारसायकलने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये रिक्षाचालक, दोन प्रवासी महिला, मोटारसायकलस्वार आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. इंदिरानगर येथील रुपादेवी परिसरात घनश्याम सिंग राहत असून ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. बुधवारी रात्री ते मुंबई-नाशिक महामार्गावरून रिक्षा घेऊन जात होते. रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी बसल्या होत्या. कॅडबरी उड्डाणपुलाच्या उताराजवळ अब्दुला अशरफी या मोटारसायकलस्वाराने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात पार्किंगवरून वाद; वाहतूक पोलिसाला मारहाण
ठाणे : ठाणे पूर्व भागातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या केलेल्या वाहनावर कारवाई केल्याने संतापलेल्या वाहन चालकासह तिघांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीवर वीट फेकून मारली. यामध्ये व्हॅनचे नुकसान झाले आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या कोपरी उपशाखेमध्ये नाईक पदावर अनिल शिंदे कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी ते एचडीएफसी बँकेसमोरील नो पार्किंग क्षेत्रातील वाहनांवर कारवाई करत होते. त्यावेळी वाहनांवर कारवाई केल्यामुळे संतप्त झालेल्या नितीन पाटील याने त्यांना मारहाण केली, तर महेश पाटील याने शिंदे यांची सरकारी गाडी अडवली आणि गिरीश पाटील याने वीट फेकून मारली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात तरण तलावात लांब पल्ल्याच्या स्पध्रेचे आयोजन
ठाणे : ठाण्यात रविवारी एका आगळ्यावेगळ्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कळवा येथील ‘स्टारफिश’ या पालकांच्या संस्थेतर्फे लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन तरण तलावात करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा विशेषत: समुद्रात आयोजित केल्या जातात. ५०० मीटर पासून ५००० मीटर अंतराच्या निरनिराळ्या गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असून पुरूष व महिला अशा एकूण २२ गटात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वय वर्षे चार ते खुला गट अशा सर्वाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या सहा विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
पादचारी असुरक्षित
ठाणे : फ्लॉवर व्हॅली परिसरात एका पादचाऱ्याच्या हातातील पिशवी चोरटय़ांनी खेचून पोबारा केल्याची घटना बुधवारी घडली. या परिसरात राहणारे नरेंद्र अग्रवाल (४६) हे घराजवळील एका रस्त्यावरील विक्रेत्याकडून कांदे खरेदी करत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या हातातील कापडी पिशवी खेचून नेली. या पिशवीमध्ये दोन हजारांची रोख रकम, बँकेचे धनादेश आणि महत्वाची कागदपत्रे होती. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा परवान्यासाठी बनावट कागदपत्रे
कल्याण: रिक्षा परवाना मिळविण्यासाठी एका भामटय़ाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट दाखला आणि कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली येथील कोपर रोड परिसरात जुगलबिहारी पांडे (३४) राहतो. रिक्षा परवाना मिळावा म्हणून त्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आणि आठवी गुणपत्रिकेचा समावेश होता. प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी कागदपत्रांची छाननी करत असताना ही कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीमध्ये कारच्या धडकेत एक जखमी
भिवंडीमध्ये कारच्या धडकेत एक पादचारी जखमी झाला आहे. ठाकूरपाडा परिसरात महादेव भोसले राहत असून ते सोमवारी रांजनोली नाका परिसरात बसची वाट पाहत होते. त्यावेळी एका कारने त्यांना धडक दिली, त्यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.