ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाच्या डोक्याच्या मधोमध चाकूने भोसकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आयाज मोमीन (१८) याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथील नवीवस्ती भागात जखमी अस्लम शेख ( ३०) आणि शाहरूख शेख (२७) वास्तव्यास आहे. त्याच परिसरात त्यांचा मित्र आयाज मोमीन हा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास अस्लम आणि शाहरुख हे आयाज याला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी आयाज याच्याकडून सिगारेट मागितली. त्यानंतर आयाज याने दोघांनाही शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शिवीगाळ का करतोस असा जाब शाखरूख याने विचारला असता, त्याने रस्त्यालगत पडलेला लोखंडी राॅड उचलून शाहरूख यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात त्यांच्या डाव्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली.

हेही वाचा – मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग

हेही वाचा – महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे

याच दरम्यान, अस्लम त्यांचा वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांच्या डोक्याच्या मधोमध आयाज याने चाकूने भोसकले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात नागरिकांकडे मदत मागू लागले. त्यानंतर आयाज घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात शाहरूख याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.