प्रिया ठाण्यातील एका उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी. अतिशय लाडात वाढलेली ही २४ वर्षीय तरुणी एमबीएचे शिक्षण घेत आहे. एकुलती एक मुलगी असल्याने आई-वडील तिच्यावर जिवापाड प्रेम करतात. तिचे जयसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या प्रेमविवाहास संमती दिली आहे. मात्र, सध्या जय परदेशात वैमानिकाचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे या दोघांचे एकमेकांसोबत मोबाइल किंवा चॅटिंगद्वारे संभाषण व्हायचे. महिनाभरापूर्वी प्रिया नेहमीप्रमाणे सामाजिक प्रसार माध्यमे तसेच ई-मेल खाती उघडून पाहत असतानाच एका अनोळखी व्यक्तीने तिला चॅटिंगद्वारे संदेश पाठविला. तिची ई-मेल आणि समाज माध्यमांवरील खाती हॅक करण्यात आल्याचे संदेशात म्हटले होते. तसेच या खात्यांमध्ये असलेले तिचे फोटो आणि प्रियकरासोबत झालेले खासगी संभाषण हाती लागले असून ते गुगलवर अपलोड करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच लाख रुपये देण्याची मागणीही त्याने केली होती. या प्रकारामु़ळे ती भेदरली. क्षणभर तिला काहीच कळेनासे झाले.
काही वेळानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आई-वडिलांसोबत ती ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये गेली. त्यांच्यासोबत जयचे आई-वडीलही होते. तिथे त्यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहपोलीस आयुक्त डुम्बरे यांनी नौपाडा पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे तसेच ठाणे खंडणीविरोधी पथक आणि सायबर गुन्हे अन्वेषण शाखेला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेशही दिले. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी तात्काळ खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्ह्य़ाच्या तपासासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी. कदम आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एकीकडे पोलीस आरोपींचा माग काढत होते तर दुसरीकडे आरोपी प्रियाला पैशांसाठी धमकावीत होता. व्हॉटस- अ‍ॅपद्वारे त्याने तिला बँक खाते क्रमांक पाठविला होता आणि त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले होते. मात्र, ती पैसे पाठवीत नसल्यामुळे त्याने तिला व्हॉटसअ‍ॅपद्वारे तिचा एक फोटो पाठविला होता. त्यामुळे तिच्यासह तिचे कुटुंबही भेदरले आणि त्याच्या धमक्यांमुळे त्यांचा मानसिक तणाव वाढू लागला.
अखेर पोलिसांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर १५ हजार रुपये पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने पाच लाखांची मागणी केली असल्यामुळे १५ हजार रुपये घेण्याची शक्यता कमी होती. परंतु, शिक्षण घेत असल्यामुळे माझ्याकडे पाच लाख रुपये नाहीत, मात्र मित्रांकडून गोळा केलेले १५ हजार रुपये पाठवीत आहे. उर्वरित पैसे लवकरच पाठवेन, असा संदेश प्रियाने त्याला पाठविला. त्यामुळे तो १५ हजार रुपये घेण्यास तयार झाला. त्यानुसार पोलिसांनी प्रियामार्फत त्याने दिलेल्या खात्यावर पैसे पाठविले. विशेष म्हणजे संबंधित बँक खाते छत्तीसगढ राज्यातील वैकुंठपूरमधील असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. मात्र, तांत्रिक तपासादरम्यान आरोपी ठाण्यातच असल्याचे समोर येत होते. त्यामुळे पोलीस अधिकारीही चक्रावले. आरोपी ठाण्यात असेल आणि छत्तीसगडमधील बँक खातेधारकाला पकडले तर आरोपी सावध होईल आणि त्याच्याकडून प्रियाच्या जीवितास धोका पोहचू शकतो, असा विचार पोलिसांच्या मनात डोकावत होता. अखेर पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये बँक खातेधारकाला पकडण्यासाठी छत्तीसगढला पथक पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी, पोलीस कर्मचारी शशिकांत निबाळकर आणि प्रशांत भुर्के असे तिघांचे पथक छत्तीसगढला रवाना झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांनी बँक खातेधारक राजूला (बदललेले नाव) ताब्यात घेतले. तो २१ वर्षांचा तरुण होता, मात्र त्याला याविषयी काहीच माहीत नव्हते. त्याने गावातील मित्र अजयला बँकेचे एटीएम कार्ड वापरण्यासाठी दिले होते. त्याच्याकडेही बँक खाते नव्हते आणि त्याचा भाऊ त्याला पैसे पाठविणार होता. माझ्या खात्यामध्येही पैसे नव्हते आणि त्याला गरज असल्यामुळे बँक खाते वापरण्यासाठी दिल्याचे राजूने पोलिसांना सांगितले. त्यामुळे राजूमार्फत पोलिसांचे पथक अजयपर्यंत पोहचले.
चौकशीदरम्यान अजयने बँकेचे कार्ड त्याचा मित्र विजयला दिल्याचे सांगितले. बँक खाते मिळविण्यासाठी अजयने राजूला जी बतावणी केली होती, तीच बतावणी विजयने अजयला केली होती. या दोघांच्या गावापासून विजयचे गाव सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर होते. तो ज्या गावात रहात होता, तिथे जवळच नक्षलवाद्यांचा परिसर आहे. त्याच्या घरी पोलिसांचे पथक पोहचले, त्यावेळी त्यांना ही बाब समजली. पथकाने ताब्यात घेऊन विजयची चौकशी केली, मात्र सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. हा गुन्हा करण्याच्या दोन महिने आधी त्याने मुंबईतील एका मॉडेलला अशाच प्रकारे धमकाविले होते आणि या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला पकडले होते. अल्पवयीन असल्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने अशाच प्रकारे पुन्हा गुन्हा केला. इंटरनेटच्या माध्यमातून त्याने ई-मेल खाती हॅक करण्याची कला अवगत केली होती आणि त्याआधारे त्याने हा खंडणीचा उद्योग सुरू केला होता, अशी माहिती तपासात पुढे आली. या गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्यामुळे प्रियाचे कुटुंब तणावमुक्त झाले आणि त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
(घटनेतील सर्व व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत.)

Story img Loader