एखाद्या गुन्ह्य़ात फरार असलेल्या आरोपीकडे मोबाइल असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य होते. पण, आरोपी मोबाइलच वापरत नसेल तर पोलिसांना तपासात स्वत:चे कौशल्य दाखवावे लागते. अशाच प्रकारे ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोणतेही धागेदोरे नसताना एका बेवारस महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आणि आरोपीकडे मोबाइल नसतानाही त्याच्या मुसक्या आवळल्या. या कौशल्यपूर्ण तपासाची ही हकीगत..

१८ फेब्रुवारी २०१६ रोजी पहाटे चारची वेळ होती. मुंब्य्रातील ठाकूरपाडा भागातील नागरी वस्तीत कुत्रे जोरजोराने भुंकत होते. या आवाजाने परिसरातील एका कुटुंबाची झोपमोड झाली. कुत्रे का भुंकत आहेत म्हणून कुटुंबातील एकाने घराबाहेर येऊन पाहिले. त्या वेळी त्याला साडीचे एक गाठोडे दिसले आणि त्या गाठोडय़ाभोवती कुत्रे होते. या गाठोडय़ात काही तरी असावे असा संशय त्याच्या मनात आला. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना जागे केले आणि मुंब्रा पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या गाठोडय़ाच्या पाहणीदरम्यान त्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. जेमतेम ३० वर्षांची ही महिला होती. घटनास्थळी ओळखपत्र किंवा कोणतीही कागदपत्रे सापडली नव्हती.
त्यामुळे या महिलेची ओळख पटविणे पोलिसांना शक्य होत नव्हते. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर या महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी अहवालात व्यक्त केला. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. मृत महिलेच्या फोटोच्या आधारे पोलिसांनी मुंब्रा परिसरात विचारपूस सुरू केली. त्यात बकरीसाठी लागणारा उंबराचा पाला विकणारी ही महिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण, तिचे नाव आणि वास्तव्याचा पत्ता मिळत नव्हता. तिच्यासोबत लांब केसाचा माणूस असायचा, पण तो सध्या बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पाला विक्री करण्यासाठी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून महिला येत असल्याने त्या भागात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शहापूर, वासिंद, खडवली, कर्जत, आसनगाव या भागात मृत महिलेचा तसेच तिच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला, पण तीन महिने उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. अखेर पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, हवालदार आनंदा भिल्लारे, सुनील जाधव पोलीस नाईक सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड यांचा समावेश होता. या पथकाने ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून रेल्वेने पाला विक्रीसाठी येणाऱ्या महिलांकडे तसेच जिल्ह्य़ातील आदिवासी पाडय़ांवर जाऊन चौकशी सुरू केली. त्यामध्ये मृत महिलेचे नाव ‘रंजना’ तर तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘बंद्या’ असल्याचे समोर आले. रंजनाच्या खुनानंतर बंद्या फरार झाला होता. त्याकडे मोबाइल नसल्यामुळे त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. तरीही त्याचा शोध घेत पोलिसांचे पथक शहापूरमधील वेहळोली गावात पोहोचले. या गावालगत असलेल्या जंगलातील एका झोपडीत तो लपून बसला होता. तेथून पोलिसांनी मोठय़ा शिताफीने त्याला अटक केली. बिंदू ऊर्फ बंद्या रघुनाथ मुकणे (२६) असे त्याचे पूर्ण नाव आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. तिच्या निधनानंतर तो रंजनासोबत राहत होता. पती-पत्नी असल्याप्रमाणेच दोघे राहत होते. मुंब्रा येथे उंबराचा पाला विकायचा आणि सायंकाळी दारू पिऊन रेल्वेने घरी परतायचे. खडवली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी झोपडी बांधली होती. तिथेच दोघे राहायचे. महिन्यातून कधी तरी दोघे वेहळोली गावात बंद्याच्या घरी जायचे. त्यामुळे गावातील लोकही रंजनाला ओळखत होते. तिचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा बंद्याला संशय होता. याच संशयातून त्याने रवी आणि संजय भय्या या साथीदारांच्या मदतीने रंजनाच्या खुनाचा कट रचला. ठरल्याप्रमाणे उंबराचा पाला विकून झाल्यानंतर तिघांनी रंजनाला दारू पाजली आणि त्यानंतर साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्याच साडीत तिचा मृतदेह बांधून त्यांनी ठाकूरपाडा भागात फेकून दिला होता. या गुन्ह्य़ात रवी आणि संजय फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.