ठाणे : आभासी चलनाच्या (क्रिप्टो) गुंतवणूकीत जास्त नफा मिळवून देतो असे सांगून घोडबंदर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीची ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर भागात फसवणूक झालेले ४२ वर्षीय नोकरदार राहतात. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या फेसबुक खात्याच्या माध्यमातून एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली होती. त्या महिलेने नोकरदाराकडून त्यांचा व्हाॅट्स्ॲप क्रमांक मागितला. तिने त्यांना आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच याबाबतची माहिती एक व्यक्ती देणार असून त्याचा तिने मोबाईल क्रमांक त्या नोकरदाराला पाठविला. नोकरदाराने त्या व्यक्तीला संपर्क साधला असता, त्यावेळी त्याने नोकरदाराला एक व्हाॅट्सॲप लिंक पाठविली. या लिंकद्वारे त्यांना आभासी चलनात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार, नोकरदाराने टप्प्या-टप्प्याने ८२ लाख रुपये त्यामध्ये गुंतविले. त्यानंतर त्यांना या गुंतवणूकीवर मोठा नफा दाखविण्यात आला.
गुंतवणूकीची रक्कम त्यांना काढता येत नव्हती. ही गुंतवणूकीची रक्कम काढण्यासाठी त्या व्यक्तीने नोकरदाराकडून शुल्काची मागणी करण्यास सुरूवात केली. आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने नोकरदाराने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे, कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.